चेहरा झाकून खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची चौकशी करा:पोलिस अधीक्षक कोकाटेंच्या व्यापाऱ्यांना सूचना, व्यापाऱ्यांनीही मांडल्या समस्या
शहरासह जिल्हाभरातील दुकानांमध्ये चेहऱ्यावर मास्क, गॉगल लाऊन, रुमाल बांधून तसेच हेल्मेट परिधान करून खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची चौकशी करावी तसेच त्यांचे चेहरे सीसीटीव्ही मध्ये दिसले पाहिजेत याकडे लक्ष देण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी शनिवारी ता. १२ व्यापाऱ्यांच्या बैठकीत दिल्या आहेत. हिंगोली येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिस अधीक्षक कोकाटे यांच्या उपस्थितीत व्यापाऱ्यांची बैठक झाली. यावेळी उपाधीक्षक अंबादास भुसारे, व्यापारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल नेनवाणी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जगजीत खुराणा, शेख नईम शेख लाल, सुरेश सराफ, कांतासेठ गुंडेवार, पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, नरेंद्र पाडळकर, गजानन निर्मले यांच्यासह व्यापारी उपस्थित होते. यावेळी व्यापाऱ्यांनी त्यांच्या अडचणी व समस्या मांडल्या. शहरातील हातगाड्यांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी तसेच शहरातील सिग्नल यंत्रणा कार्यान्वयीत करावी, व्यापाऱ्यांना रात्री अकरा वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी, यासह इतर समस्या व अडचणी मांडल्या. यावेळी पोलिस अधीक्षक कोकाटे यांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिस प्रशासन सतर्क आहे. मात्र अनेक वेळा आरोपींची ओळख पटवण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे चेहऱ्यावर मास्क लाऊन, रुमाल गुंडाळून तसेच हेल्मेट परिधान करून दुकानात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची चौकशी करावी. त्यातून सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांचे चेहरे ओळखणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील हातगाडे, पार्किंग व्यवस्थे बाबत पालिका प्रशासनाला पत्र देऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या शिवाय शहरातील रस्त्यावरील अतिक्रमणाबाबतही पालिकेला कळवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. रात्री आकरा वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले. औद्योगिक वसाहतीमधील पोलिस चौकी सुरु करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.