फडणवीसांच्या मंत्र्यांने स्वत:चे विवस्त्र फोटो महिलेला पाठवले:जयकुमार गोरे विकृत, स्वारगेटसारखे प्रकरण; संजय राऊतांचा आरोप
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जयकुमार गोरे यांनी स्वारगेटसारखे प्रकरण केल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. मंत्री गोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील एका स्त्रीचा छळ आणि विनयभंग केल्याची माहिती समोर आल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला. ती महिला पुढील काही दिवसात विधान भवनासमोर उपोषणाला बसणार असल्याची बातमी येत आहे, असेही ते म्हणाले. एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांन मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तर दुसरीकडे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. महायुती सरकारचे दोन मंत्री आधीच अडचणीत असताना आता संजय राऊत यांनी जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत बोलताना संजय राऊत यांनी जयकुमार गोरे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. काय म्हणाले संजय राऊत? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे आणि लाडके मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वारगेटसारखे प्रकरण केले आहे. ते एक विकृत मंत्री आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील एका स्त्रीचा, मंत्री गोरे यांनी छळ आणि विनयभंग केला आहे, त्याची माहिती समोर आली आहे. ती महिला येत्या काही दिवसात विधान भवनासमोर उपोषणाला बसणार असल्याची माहिती आहे, असे संजय राऊत म्हणालेत. मंत्रिमंडळातील सर्व रत्नांची पुन्हा तपासणी करा संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. आता हे पात्र नवीन तुमच्या मंत्रिमंडळात निर्माण झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळाचे पत्ते पुन्हा एकदा पिसले पाहिजे, असा सल्ला राऊत यांनी दिला. त्यांनी पुन्हा एकदा सर्व मंत्र्यांची झाडाझडती घेतली पाहिजे. कुणाचे नक्की काय आहे, हे समोर आले पाहिजे. त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व रत्न त्यांनी पुन्हा एकदा तपासली पाहिजेत. ही सर्व रत्ने, 14 आहेत की जास्त, ही सर्व रत्ने तपासले पाहिजे. जयकुमार गोरे यांच्या बाबत समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. गंभीर आहे आणि महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे, असे ते म्हणाले. कलंकित मंत्र्यांना मंत्रिमंडळात का ठेवले आहे? काल तुम्ही अबू आझमीच्या राजीनाम्याची मागणी केली, पण अबू आझमी तुमचाच माणूस आहे. तो तुमच्या मदतीला धावला. त्याच पद्धतीचे गंभीर स्वरुपाचे आरोप फक्त औरंगजेबाची प्रतिष्ठा वाढवण्याचे वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्राला कलंक लागत नाही. तर हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील स्त्रीचा विनयभंग केला आणि तो मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात असेल, तर त्यामुळे हा महाराष्ट्र कलंकित होतो. अशा कलंकित मंत्र्यांना आपण का मंत्रिमंडळात ठेवलेले आहे? असा सवाल संजय राऊत यांनी केला. अमित शाह यांना पत्र लिहिणार या प्रकरणात आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहणार असल्याचे संजय राऊत म्हणालेत. तर भाजपच्या महिला मोर्चाच्या पदाधिकारी याविषयी का बोलत नाही. सर्वच पक्षातील महिला पदाधिकारी, आमदार का बोलत नाहीत, असा सवाल त्यांनी यावेळी केला. तर महिला आयोग कुठंय अशी विचारणा त्यांनी केली. विजय वडेट्टीवारांचाही सरकारवर हल्लाबोल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही जयकुमार गोरे यांच्या जोरदार टीका केली. राज्यातला एक पैलवान मंत्री, रोज व्यायाम करणारा, तो विवस्त्र फोटो महिलेला पाठवतो. हा मंत्री पश्चिम महाराष्ट्रातील आहे. 10 दिवस जेलची हवा खातो. त्याच्या पलीकडे जाऊन 10 हजारांचा दंड भरून न्यायालयात माफी मागतो. त्यानंतरही तो महिलेच्या मागे लागतो. विवस्त्र फोटो पाठवलेला मंत्री जर मंत्रिमंडळात असेल तर यापेक्षा लज्जास्पद, महाराष्ट्राच्या इतिहासात अशा काळ्या मंत्र्यांची यादी रोज वाढत चालली आहे असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.