शेतकऱ्यांची कर्जमाफी, महिलांच्या खात्यात 2100 रुपये कधी देणार?:अंबादास दानवे यांचा सवाल; हनुमान मंदिरावरून सोमय्यांवर निशाणा
महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आणि लाडकी बहिण योजनेमध्ये महिलांच्या खात्यात 2100 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे आता आम्ही या दोन्ही घोषणांची वाट पाहत असल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. या माध्यमातून दानवे यांनी नागपूर अधिवेशनात सरकारला घेरण्याचा इशारा दिला आहे. राज्य सरकार हमी भावाला मुदतवाढ देत आहे. मात्र, कुठेही खरेदी केंद्र चालू नाही. त्यामुळे हमी भावाला मुदतवाढ देऊन काय उपयोग? असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला. या माध्यमातून दानवे यांनी शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याची तसेच शेतकऱ्यांकडून माल खरेदी करायची मागणी केली आहे. सोमय्या यांनी सरकारला जाब विचारावा दादर येथील रेल्वे स्थानकावर असलेले हनुमान मंदिराचा मुद्दा देखील सध्या राज्यात गाजत आहे. भाजप स्वतःला हिंदुत्ववादी म्हणते. आणि दादर येथील 80 वर्षे जुन्या मंदिराला नोटीस दिली जात असल्यावरुन अंबादास दानवे यांनी भाजपवर टीका केली. किरीट सोमय्या यांनी हनुमान मंदिराच्या दर्शनला जाण्यापेक्षा त्यांच्या स्वतःचे पक्षाचे राज्यात आणि केंद्रात सरकार आहे. त्यांनी सरकारला याबाबत जाब विचारावा, असे आवाहन देखील दानवे यांनी केले आहे. खरे खोटे हे केवळ मोदी आणि शहा यांनाच माहिती राज्यांमध्ये 23 तारखेला सरकारला बहुमत मिळाले आहे. मात्र तब्बल 20 दिवस झाल्यानंतर देखील अद्याप पूर्ण मंत्रिमंडळ नाही. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. मात्र उपमुख्यमंत्र्यांकडे कोणत्याच खात्याचा कारभार नाही. अशा पद्धतीने या राज्याचा कारभार चालू आहे. केवळ मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखा समोर येत आहेत. त्यामुळे खरे खोटे हे केवळ मोदी आणि शहा यांनाच माहिती असल्याचे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. सरकारचे वाभाडे आधीच समोर येत आहेत महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणुकीत जागा कमी झाल्या असल्या तरी देखील राज्यातील जनतेसाठी आमचा लढा सुरू राहणार असल्याचे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. नागपूर अधिवेशनात सरकारचे वाभाडे काढण्याची गरज नाही. कारण त्यांचे वाभाडे आधीच समोर येत असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. हे सरकार कशा पद्धतीने आले, हे अद्याप जनतेला देखील कळाले नाही. अशी सध्या सरकारची स्थिती असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.