वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणात केला प्रवेश:मंत्री असताना लाडकी बहीण योजना केली लॉन्च, जाणून घ्या आदिती तटकरेंचा राजकीय प्रवास
महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळात पुन्हा एकदा स्थान मिळवत आदिती तटकरे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत ठसा उमटवला आहे. आदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालविकास खाते होते. तसेच त्यांच्याच काळात गेम चेंजर ठरलेली लाडकी बहीण योजना आणण्यात आली असल्याने राज्यभरात त्यांची चांगलीच ओळख निर्माण झाली. आदिती सुनील तटकरे यांचा जन्म महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रोहा या गावी झाला. आदिती तटकरे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत. अदिती तटकरे यांनी त्यांचे शिक्षण महाराष्ट्रात घेतले, जिथे त्यांना सामाजिक समस्या आणि सार्वजनिक प्रशासनात रस निर्माण झाला. राजकारणात प्रवेश केल्यानंतर अदिती तटकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकीय परिदृश्यात योगदान देण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्यापूर्वीपासूनच आदिती राजकारणात सक्रिय आहेत. 2008-2009मध्ये वडिलांच्या प्रचार रॅलीत त्यांनी भाग घेतला होता. त्यावेळी श्रीवर्धन हा नवीन विधानसभा मतदारसंघ तयार झाला होता. 2011-2012मध्ये सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेस वाढवायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी तरुणींना राजकारणात येण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत आदितींनी राष्ट्रवादी युवती काँग्रेस जॉईन केली आणि त्यांच्या राजकीय प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. 2012 पासून त्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कोकण विभाग संघटक म्हणून काम करत आहेत. 23 फेब्रवारी 2017 रोजी रोहा तालुक्यातील वरसे जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या पहिल्यांदा विजयी झाल्या. 21 मार्च 2017 रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी दोन वर्षे काम पाहिलं. 2019मध्ये श्रीवर्धनमधून आमदार म्हणून विजयी झाल्या होत्या. वयाच्या 31व्या वर्षीच अदिती तटकरे त्यांच्यावर राज्य मंत्रीपदाची जबाबदारी माहाविकास आघाडीच्या काळात देण्यात आली होती. या सरकारमध्ये असताना त्यांच्याकडे उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क या खात्याच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे 2019 मध्ये त्या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. शरद पवार राजकारणातील आदर्श
राजकारणात यायचे ठरवले नव्हते. वडील राजकारणात होते. त्यामुळे घरात राजकारणाचे वातावरण होते. त्या वातावरणात वाढल्यानेच राजकारणाकडे ओढले गेले. विलासराव देशमुख आणि शरद पवारांना अत्यंत जवळून पाहण्याची संधी मिळाली. शरद पवारांकडे सर्व पिढ्यांशी संवाद साधण्याची कला आहे. माझे आजोबा, वडील आणि माझ्याशी ते मनमोकळेपणाने संवाद साधतात. शरद पवार हेच माझे राजकारणातील रोल मॉडल आहेत. त्यांना पाहूनच मी राजकारणात आले, असे अदिती तटकरे एकदा एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या. आदिती तटकरे यांचा राजकीय प्रवास
2020-2022 : श्रीवर्धन मतदारसंघातून महाराष्ट्राच्या रायगड जिल्हा सरकारचे पालकमंत्री झाले. 30 डिसेंबर 2019 – 29 जून 2022 : महाराष्ट्र राज्य सरकारचे मंत्री म्हणून कायदा आणि न्यायव्यवस्था, उद्योग, खाण खाते, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा आणि युवक कल्याण, प्रोटोकॉल माहिती आणि जनसंपर्क आणि बंदरे विकास ही खाती सांभाळली. 26 नोव्हेंबर 2019 – विद्यमान : श्रीवर्धन मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. 02 जुलै 2023 – विद्यमान : त्यांची महाराष्ट्र सरकारमध्ये महिला आणि बालविकास मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याच खात्यातून 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली. याच खात्याचे मंत्रिपद त्यांच्याकडे यंदाच्या मंत्रिमंडळात राहण्याची शक्यता आहे.