चार लाडक्या भावांनी उचलले लाडकी बहिण योजनेचे पैसे:नाव कमी करण्याच्या पत्रानंतर झाला उलगडा, शासनाच्या निर्देशानुसार पुढील कारवाई होणार

लाडक्या बहिण योजनेमधील कारनामे आता हळूहळू पुढे येऊ लागले असून हिंगोली जिल्हयातील चार लाडक्या भावांनीच लाडकी बहिण योजनेत नांव टाकून सहा हप्ते उचलले आहेत. विशेष म्हणजे कारवाईच्या भितीने या भावांनी दिलेल्या अर्जावरून हा उलगडा झाला आहे. आता या प्रकरणात शासनाच्या निर्देशानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या सुत्रांनी सांगितले. राज्यात शासनाने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहिर केली होती. या योजनेमध्ये पात्र महिलांना १५०० रुपये महिना देण्याची घोषणा करून त्यांच्या बँक खात्यात पैसेही जमा होण्यास सुरवात झाली होती. त्यासाठी महिलांनी ऑनलाईन प्रस्ताव दाखल करून त्यांचे आधारकार्ड, बँक खाते क्रमांक तसेच छायाचित्र अपलोड करण्यात आले होते. दरम्यान, हिंगोली जिल्हयातून सुमारे ३.५० लाख महिलांनी लाडकी बहिण योजनेचे अर्ज दाखल केले होते. पंचायत समितीस्तरावरून सदर अर्ज मंजूर केल्यानंतर महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यानंतर शासनाने काही दिवसांपुर्वीच या योजनेचा लाभ बंद करण्याबाबत अर्ज देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार हिंगोली जिल्हयातून आठ जणांनी लाभ बंद करण्याचा अर्ज दिला आहे. विशेष म्हणजे यामध्ये चार पुरुषांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात महिला व बालविकास अधिकारी राजेश मगर यांनी सांगितले की, योजनाचा लाभ बंद करण्या संदर्भात आठ अर्ज प्राप्त झाले असून त्यामध्ये चार पुरुषांची नांवे असल्याचे दिसून आले आहे. त्यांनी आधारकार्डवर महिलांचे छायाचित्र लाऊन प्रस्ताव दाखल केला असावा. या चौघांच्या बँक खात्यावर सहा हप्ते जमा झाल्याचेही त्यांनी सांगितले. सदर चारही पुरुष औंढा नागनाथ तालुक्यातील असून महेश भांडे, रामराव काळे, गजानन काळे, शिवाजी भांडे अशी चौघांची नांवे असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु करण्यात आली असून नेमकी नांवात चूक झाली आहे काय याची तपासणी करून त्यामध्ये सत्यता आढळून आल्यास शासनाच्या निर्देशानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे मगर यांनी सांगितले.

  

Share