नाशिक येथील रामकुंडात रात्री एक तरुण पाण्याच्या प्रवाहात अडकल्याची घटना घडली. गंगापूर धरणातून विसर्ग वाढल्यामुळे तो अचानक पाण्यात अडकला. जवळपास अर्धा तास त्याने सिमेंटच्या खांबाचा आधार घेतला. हा प्रसंग स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रेस्क्यू टीमला माहिती दिली. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर तरुणाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. वेळेवर मदत मिळाल्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली. नाशिक जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून पावसाचा जोर वाढला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरणातून सध्या 4,656 क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे रामकुंड परिसरात पूरस्थिती निर्माण झाली असून परिसरातील भागांत पुन्हा पुराचे पाणी शिरले आहे. गोसेखुर्द धरणाचे सकाळपासून 12 गेट बंद गोसेखुर्द धरणाचे सध्या 15 गेट अर्धा मीटर उघडे ठेवण्यात आले असून त्यातून 62,139 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. काल 27 गेट उघडून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला होता. मात्र आज सकाळपासून 12 गेट बंद करून केवळ 15 गेटमधून विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसात घट झाल्यामुळे विसर्गात कपात करण्यात आली आहे. हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट आज रविवारी (दि. 6 जुलै) हवामान विभागाने पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिकचा घाटमाथा, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच मुंबई, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. चंद्रपूरमध्ये जोरदार पाऊस चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात आज संध्याकाळपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मागील आठ ते दहा दिवसांपासून येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता, तसेच जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचे दिसून आले होते. मात्र आज अचानक झालेल्या जोरदार पावसाने शहरासह जिल्ह्याला झोडपून काढले. अवघ्या एका तासात पडलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.