ईडीपासून मुक्ती मिळवण्यासाठी भाजपसोबत गेलो:छगन भुजबळ यांच्या दाव्याने राजकीय खळबळ; पण भुजबळांनी वृत्त फेटाळले

मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, मी उच्च जातीचा असतो तर केंद्रीय यंत्रणांनी मला असे वागवले नसते, असे छगन भुजबळ एका मुलाखतीत म्हणाल्याचा दावा ​​​​​​ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी आपल्या ‘2024 : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकात केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खळबळ माजली आहे. काही वृत्तपत्रांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. मी ओबीसी असल्याने माझ्यावर कारवाई झाली. मात्र, मी भाजपबरोबर गेल्याने मला ईडीपासून सुटका मिळाली. माझ्यासाठी ईडीपासून मुक्ती म्हणजे पुनर्जन्म आहे. आजही मला झोपेत तुरुंगातले दिवस आठवले तर मला कसंतरी होतं’, असा मोठा गौप्यस्पोटच भुजबळ यांनी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी लिहिलेल्या ‘2024 द एलेक्शन दॅट सरप्राइज इंडिया’ या पुस्तकातून केल्याचे सांगण्यात आले आहे. नेमके काय दावे? राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकामध्ये असा दावा करण्यात आला की, छगन भुजबळांनी म्हटले की, भाजपबरोबर सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद सर्वांना झाला. कारण अर्थातच ईडीपासून सुटका. माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता. मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या. उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते. दोन-अडीच वर्षे तुरुंगात राहूनही ईडीची पुन्हा नोटीस आली. वयाच्या पंचाहत्तरीत कितीवेळा चौकशांना सामोरे जायचं. तुरुंगात असताना भाजपात आलात तरच सुटका होईल, असं अनिल देशमुखही म्हणतात, अजूनही तुरुंगातील दिवस आठवले की माझी झोप उडते, आता या वयातही ईडी माझा पिच्छा सोडायला तयार नाही, असे छगन भुजबळ यांनी म्हटल्याचा दावा पुस्तकात करण्यात आला आहे. ..तर यंत्रणा माझ्या मागे लागल्या नसत्या मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या. उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते’, असे छगन भुजबळ यांनी मुलाखतीत म्हटल्याचे ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘2024: द इलेक्शन देंट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकात या गोष्टी नोंदवण्यात आल्या आहेत. या पुस्तकातील ‘हमारे साथ ईडी है’ या शीर्षकाच्या प्रकरणात राज्यातील राजकारण आणि पक्ष फोडाफोडीच्या राजकारणामागील कथित सत्य सांगितल्याचे पुस्तकात दिसून येते. भुजबळांनी वृत्त फेटाळले छगन भुजबळ यांंनी आज तातडीने पत्रकार परिषद घेत असे दावे केल्याचे वृत्त फेटाळले. विशेष म्हणजे मी अशी कुठलीही मुलाखत लोकसत्ताला दिली नसल्याचे त्यांनी सांगितले. भुजबळ पुढे म्हणाले की, महाराष्ट्र सदन प्रकरणी उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना क्लीनचीट मिळाली तेव्हा मी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना पेढे देखील दिले. आम्ही काही जेलमध्ये जाण्याच्या भीतीने सरकारमध्ये गेलो नाही तर विकासासाठी आम्ही महायुतीसोबत गेलो. मी हे पुस्तक स्वत: वाचणार असून माझ्या वकीलांनादेखील देणार आहेय निवडणुकीनंतर यावर काय कारवाई करता येईल ते बघून कारवाई करणार आहे.

  

Share