घरातील एकुलत्या एक कमावत्या मुलाचा दुर्दैवी अंत:झाडावरील आंबे काढताना झाला विद्युत तारेला स्पर्श, रत्नागिरीतील धक्कादायक घटना
रत्नागिरीत एक दुर्दैवी घटना घडली आहे. आंबे काढताना एका तीस वर्षीय युवकाचा शॉक लागून दुर्दैवी अंत झाला आहे. झाडवरून आंबे काढत असताना त्याचा विद्युत तारेला स्पर्श झाला व त्याला जोराचा शॉक लागला. महेश राजू इलम असे या युवकाचे नाव होते. इलम कुटुंबातील कमावणारा महेश हा एकुलता एक मुलगा होता. महेशच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे इलम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल आहे. महेश इलम हा खेड तालुक्यातील पोसरे येथे राहत होता. ऊस तोडणीच्या कामासाठी महेश पश्चिम महाराष्ट्रात व आंबा हंगामामध्ये कोकणात आंबे काढण्याचे काम करत असे. शनिवारी सकाळी 8.45 च्या सुमारास महेश राजू इलम हा रत्नागिरी शहरातील चंपक मैदान येथे आंबे तोडण्यासाठी गेला होता. यावेळी ही घटना घडली आहे. महेश हा अनिल नार्वेकर यांच्याकडे कामाला होता. महेशच्या हातातील घळाचा स्पर्श आंब्याच्या झाडाशेजारून जाणाऱ्या विद्युत तारेला झाला. त्यामुळे महेशला जोराचा शॉक लागला व थरथरायला लागला. ही बाब इतरांच्या लक्षात येताच महेशला खाली उतरवले व तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महेशला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणाची रत्नागिरी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. महेशच्या मृत्यूने इलम कुटुंबावर दुःखाचे मोठे डोंगर कोसळले आहे. आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी महेश मजुरी करायचा. इलम कुटुंबातील महेश हा एकुलता एक कमावणारा व्यक्ती होता. महेशच्या पश्चात आई-वडील पत्नी व तीन मुळे असा परिवार आहे. महेशच्या मृत्यूमुळे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. हातावर पोट असलेल्या या कुटुंबाला शासकीय मदत मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.