माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणी खडसे यांनीही चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर, जळगावच्या जामनेर येथे भाजपने एकनाथ खडसे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून आंदोलन केले. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. एकनाथ खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गिरीश महाजन यांच्या अनेक सिड्या प्रफुल्ल लोढा यांच्याकडे आहेत, असा खळबळजनक गौप्यस्फोट खडसे यांनी केला. ते पुढे म्हणाले, माझ्या विरोधात आंदोलन करून जोडे मारण्याऐवजी गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढा यांना जोडे मारा. खडसे म्हणाले, मी एका पदाधिकाऱ्याला विचारले की आंदोलन का करत आहात? त्यावर तो म्हणाला की, वरिष्ठांचा आदेश आहे, म्हणून तुमच्या विरोधात आंदोलन करत आहोत. अशा प्रकारे त्यांनी भाजपवर खोचक टीका केली. पुढे बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, विषारी पिल्लांना मी मोठे केले याचे मला दुःख वाटते, मी कधीही माझ्या जावयाचे समर्थन केले नाही. कुणाची एक तरी तक्रार आहे का? मग तरीदेखील रुपाली चाकणकर या कोणत्या आधारावर बोलत आहेत? माझं नाव सतत का घेता, माझा जावई आहे तो. तुमचा मुलगा घराबाहेर गेल्यावर तुम्हाला कळतं का? तो दारू पितो का ते? फक्त राजकारणात नाथाभाऊंना बदनाम करून हनी ट्रॅपवरून लक्ष विचलित करणे हा उद्योग सध्या सुरू आहे. मात्र काहीही झाले तरी मी प्रफुल लोढाचा विषय सोडणार नाही, असा इशारा खडसे यांनी दिला आहे. खेवलकर प्रकरणात पुण्यातील पोलिस तोंडघशी पडले आहेत. लोढाकडे कोणत्या व्हिडीओ क्लिप आहेत त्या तपासा. कोणत्या मंत्र्याच्या सीडी आहेत ते तपासा, नाशिकच्या हनी ट्रॅपमध्ये 72 अधिकारी आणि चार मंत्री आहेत, याची सखोल चौकशी पोलिसांनी करावी, अशी मागणी देखील यावेळी एकनाथ खडसे यांनी केली आहे.