शहामृग वृत्ती चालणार नाही:मंत्रिमंडळाची बैठक बोलवा – राज्यपालांचे ममतांना निर्देश

महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार व हत्येप्रकरणी न्यायासाठी प. बंगालमध्ये संताप वाढत आहे. राज्यपाल डॉ. सीव्ही आनंद बोस यांनी रविवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना तातडीने मंत्रिमंडळ बैठक बोलावण्याचे निर्देश दिले. पोलिस आयुक्त विनीत गोयलांची बदली करण्यावर सरकारने निर्णय घ्यावा, असेही बोस म्हणाले. राज्याने संविधान व कायद्यानुसार काम करावे. शहामृगासारखी वृत्ती चालणार नाही. सुप्रीम कोर्टात आज सुनावणी, सीबीआय देणार अहवाल : सुप्रीम कोर्टात सोमवारी दुसऱ्यांदा या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सीबीआय सोमवारी सीएफएसएल अहवाल कोर्टात सादर करू शकते. या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाने स्वत:हून दखल घेतली होती. तृणमूल खासदार जवाहर म्हणाले, राजीनामा देणार
तृणमूलचे खासदार जवाहर सरकार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. ममतांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी लिहिले की, बलात्कार प्रकरणात सरकारची भूमिका खराब होती. कारवाईच्या नावाखाली सरकारने कागद काळे केले. रविवारी कोलकाता येथे अनेक शैक्षणिक संस्थांचे माजी विद्यार्थी, क्ले मॉडेलर्स, हातगाडीवाल्यांनी निदर्शने केली. ४० शाळांतील ४००० माजी विद्यार्थ्यांनी द. कोलकात्यात दोन किमी पदयात्रा काढली.

Share