बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणातील फरार आरोपी गोट्या गित्ते याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. रेल्वे रुळावर बसून हा व्हिडिओ शूट केला असून, यात त्याने थेट आत्महत्येचा इशारा दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी माझ्यावरील आरोप थांबवावेत, अन्यथा मी आत्महत्या करेन आणि त्याला जबाबदार फक्त जितेंद्र आव्हाड असतील, असा इशारा गोट्या गित्तेने दिला आहे. तसेच वाल्मीक कराड हे साक्षात विठ्ठलाचे रूप आहेत, तर बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोप बबन गित्तेने पोलिसांना शरण जावे, असेही गोट्या गित्ते याने म्हटले आहे. गोट्या गित्तेला घाबरणारा मी नाही गोट्या गित्तेने दिलेल्या इशाऱ्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गोट्या गित्ते हा मला धमकी देण्याचे काम करतोय. वाल्मीक कराड याचा उजवा हात म्हणून तो ओळखला जातो. बापू आंधळे खून प्रकरणात देखील त्याचा सहभाग होता. इन्स्पेक्टर महाजन याने गित्तेलाही वाचवण्याचे काम केले आहे. गित्ते हा नामचीन गुंड आहे. त्याला घाबरणारा मी नाही. महादेव मुंडे याच्या खून प्रकरणात देखील मुख्य सूत्रधार तोच होता, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे. पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, महादेव मुंडे खून प्रकरण त्यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी लाऊन धरल्याने सगळी गॅंग अडचणीत आली आहे. त्यात मोठमोठ्यांची नावे आहेत. तिलाही ऑफर कोणी दिली आहे, जी 12 गुंठे जमीन आहे, महादेवचा खून झाला, ती जमीन तुझ्या नावावर करतो. तू हे प्रकरण बंद कर, असा दावा आव्हाड यांनी केला आहे. मी ओरिजनल वंजारी वंजारी सर्टिफिकेटची मला गरज नाही. मी ओरिजनल वंजारी आहे. रक्तात वंजारीचे खून आहे. माझे आजोबा वारकरी होते. आमचे घराणे अतिशय धार्मिक आहे. वंजारीची ओळख म्हणजे कष्टाचा दुसरे नाव आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. पुढे ते म्हणाले, मुंबई सेंट्रलचा हमालांमध्ये 90 टक्के वंजारी आहे. कल्याणमधील हमाल वंजारी आहेत. हे वंजारींना बदनाम करून टाकतील. या गँगने समाजाला बदनाम करून टाकले आहे. हा कोण गोट्याफोट्या, याला कोण भीक घालतंय समाजाला कुठेतरी विरोधक म्हणून उभे केले. वंजारी कुणाचा विरोधक नाही. बीड म्हणजे भगवान बाबाला मानणारे आहे. भगवान बाबा म्हणजे सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालणारे आहेत आणि हे काय मला सांगतात वंजारी बदनाम करून टाकला. धमक्यांना घाबरून मी माझे बोलणे बंद करणार नाही. हा कोण गोट्याफोट्या, याला कोण भीक घालतंय, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी हल्लाबोल केला आहे.