हकालपट्टीनंतर सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा:स्वतः स्पष्ट केली भूमिका; म्हणाले -‘कुठे जाणार आहे, हे ठरवलेले नाही’

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा मधून हकालपट्टी झाल्यानंतर सुधाकर बडगुजर हे राज्याच्या राजकीय चर्चेचे केंद्रबिंदू ठरले आहेत. ते भाजपमध्ये प्रवेश करणार का? यावरून अनेक तर्कवितर्क सुरू असतानाच, आज त्यांनी स्वतः पुढे येत या चर्चांवर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. पत्रकारांशी संवाद साधत ते म्हणाले की, “मी अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. कार्यकर्ते, समर्थक, हितचिंतक यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहे. भाजपमध्ये जाण्याच्या बातम्या माझ्या माहितीत नाहीत आणि वरिष्ठ पातळीवर काय सुरू आहे, याची मला माहिती नाही.” हकालपट्टीची पार्श्वभूमी सुधाकर बडगुजर हे नाशिक जिल्ह्यातील सक्रिय नेते असून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे. मात्र, पक्षांतर्गत मतभेद, आणि काही ठिकाणी उघड विरोध केल्यामुळे पक्षाकडून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. शिवसेनेच्या एका स्थानिक नेत्याविरोधात उघडपणे बोलणे, आणि सोशल मीडिया वरून पक्षविरोधी वातावरण निर्माण करणे हे हकालपट्टीचे कारण असल्याचे सांगण्यात आले. त्यावर बडगुजर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, “मी कुणाच्या विरोधात बोललो नाही, पण मत मांडल्यावर शिक्षा केली गेली.” भाजप प्रवेशाच्या शक्यता हकालपट्टीनंतर लगेचच राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. सुधाकर बडगुजर आता भाजपमध्ये प्रवेश करणार का? ही चर्चा वाढण्याचे कारण म्हणजे, बडगुजर हे भाजपच्या एका गटाशी जुने संबंध ठेवून आहेत. त्याशिवाय, नाशिकमध्ये सत्तेचा केंद्रबिंदू असलेला भाजप हा अनेक बंडखोर आणि नाराज नेत्यांसाठी सुरक्षित पर्याय ठरतो आहे. मात्र या चर्चांवर प्रतिक्रिया देताना बडगुजर म्हणाले, “मी कुठे जाणार आहे, हे अजून ठरवलेले नाही. सध्या सर्वच पक्षांतून आमंत्रण येत आहेत. मी कोणत्याही पक्षात प्रवेश करताना अटी-शर्ती लावणार नाही.” समर्थकांचा पाठिंबा महत्त्वाचा बडगुजर यांनी स्पष्टपणे सांगितले की, “मी एकट्याने निर्णय घेणार नाही. माझ्या समर्थक आणि कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करूनच पुढचा निर्णय घेतला जाईल. हे वक्तव्य हे सूचित करते की, बडगुजर आपल्या कार्यकर्त्यांच्या भावना आणि स्थानिक सामाजिक समीकरण लक्षात घेऊनच आगामी निर्णय घेणार आहेत. सीमा हिरे यांच्याशी विरोधाचे नाते बडगुजर यांनी भाजपच्या स्थानिक आमदार सीमा हिरे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांचा संभाव्य भाजप प्रवेश काहींच्या दृष्टीने आश्चर्यकारक वाटतो आहे. या मुद्द्यावर बडगुजर म्हणाले, “मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली, त्यामुळे त्यांचा विरोध स्वाभाविक आहे. पण सध्याच्या राजकारणात असे विरोध सहज मिटतात. यावरुन बडगुजर कोणत्याही राजकीय वैराला थांबवणारा अडथळा मानत नसल्याचे संकेत त्यांनी दिले आहे. राजकीय भवितव्य काय? सोशल मीडियावरील आरोप-प्रत्यारोपांवर स्पष्टीकरण राजकीय हालचालींबरोबरच सोशल मीडियावर बडगुजर यांच्याबाबत काही आरोप-प्रत्यारोपही व्हायरल होत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, “सोशल मीडियावर काय सुरू आहे, याची मला फारशी माहिती नाही. मी माझ्या मार्गावर चालत आहे. सुधाकर बडगुजर यांच्या राजकीय भविष्याची चर्चा सध्या तुफान रंगली आहे. त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावर अधिकृत मोहर लागलेली नसली तरी त्यांनी दिलेल्या वक्तव्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की, ते लवकरच मोठा निर्णय घेणार आहेत. कार्यकर्ते, समर्थक, आणि स्थानिक राजकीय समीकरणं पाहता, बडगुजर यांची आगामी भूमिका केवळ नाशिकसाठीच नाही, तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठीही महत्त्वपूर्ण ठरू शकते.

  

Share