आधी शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पैशांचा विचारला हिशोब:आता कृषिमंत्र्यांनी मागितली माफी, म्हणाले – मान सन्मान दुखावला गेला असेल तर दिलगिरी

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दोन दिवसांपूर्वी कर्जमाफीच्या संदर्भात बोलताना शेतकऱ्यांनाच खडे बोल सुनावले होते. त्यांनी कर्जमाफीच्या पैशांचे तुम्ही काय करता? असे म्हणत माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पैशांचा हिशोब विचारला होता. यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांनी आपल्या त्या विधानावरून माफी मागितली. शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखावला गेला असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे माणिकराव कोकाटे म्हणाले. दोन दिवसांपूर्वी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत होते. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना कर्जमाफीविषयी विचारणा केली. त्यावर कोकाटे यांनी कर्जमाफीच्या पैशांचे तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाचीतरी गुंतवणूक करता का? असा सवाल करत शेतकऱ्यांनाच सुनावले होते. यानंतर माणिकराव कोकाटे यांच्यावर राज्यभरातील शेतकऱ्यांसह राजकीय वर्तुळातून टीका होत होती. टीकेची झोड उठल्यानंतर अखेर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते. काय म्हणाले कृषिमंत्री कोकाटे?
शेतकऱ्यांची अनावधानाने आणि मस्करीत कुस्ती झाल्याने असे वक्तव्य केल्याचे कोकाटे म्हणाले. शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखावला गेला असेल, भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो , असे म्हणत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली. गेले 8 दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई शासनाकडून दिली जाईल, असे आश्वासन माणिकराव कोकाटे यांनी दिले. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी प्राप्त व्हावी म्हणूनच राम नवमीचा मुहूर्त साधून आज मी जाणीवपूर्वक काळाराम मंदिरात दर्शनास आलो होतो. महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांसाठी मी प्रभू रामचंद्राकडे समृद्धी आणि सुख मागितले आहे. त्या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांसाठी आगामी दिवस हे निश्चितच चांगले असतील, यावर माझा विश्वास आहे, असेही कोकाटे म्हणाले. कृषिमंत्री पुन्हा शेतकऱ्यांच्या बांधावर दरम्यान, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे नाशिक जिल्ह्यातील बागलान, सटाणा परिसरात जाऊन पाहणी करणार असल्याची माहिती मिळत आहे. या परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, डाळ, टोमॅटो, गहू आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या माडसांगवी परिसरातील द्राक्ष बागांचा झालेल्या नुकसानीची पाहणी माणिकराव कोकाटे यांनी केली होती. याच दौऱ्यादरम्यान कर्ज माफीबाबत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. अशातच आता कृषिमंत्री पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत. नेमके काय म्हणाले होते माणिकराव कोकाटे? माणिकराव कोकाटे दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर आले गेले होते. त्यावेळी अजितदादा बोलले की कर्जमाफी होणार नाही, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का? असा प्रश्न शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांना विचारला होता. शेतकऱ्याच्या या प्रश्नाचे उत्तर देताना माणिकराव कोकाटे यांनी जे नियमितपणे कर्ज भरतात त्यांनी भरावे, असा सल्ला दिला. कर्ज घ्यायचे आणि पाच ते दहा वर्ष कर्जमाफी होण्याची वाट पाहायची. तोपर्यंत काही भरायचे नाही. समोर मीडिया उभी आहे. त्यामुळे मीडियासमोर मी जास्त बोलत नाही. पण मला एक सांगा, कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. त्या पैशांचे तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक आहे का? असा सवाल माणिकराव कोकाटे यांनी केला होता. आता सरकार तुम्हाला (शेतकऱ्यांना) शेतीमध्ये गुंतवण्यासाठी पैसे देणार आहे. तुम्हाला पाईपलाईनाला पैसे आहेत. सिंचनासाठी पैसे आहेत. तुम्हाला शेततळ्यासाठी पैसे आहेत. सरकार भांडवली गुंतवणूक करते. भांडवली गुंतवणूक शेतकरी करतात का? शेतकरी म्हणतात की, पीक विम्याचे पैसे पाहिजेत. मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा, असे विधान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले.

  

Share