ही तीच शिंगे आहेत गुवाहाटीला जाताना अंगावर घेतली होती:संजय राऊतांना चौकात आणले पाहिजे, गुलाबराव पाटलांचा जोरदार हल्लाबोल

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे सातत्याने भाजप तसेच महाययुतीच्या नेत्यांवर टीका करत असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर अजून राहण्यासाठी का गेले नाहीत? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच भाजपच्या गोटात चर्चा आहे की, कामाख्या देवीसमोर रेडे कापले त्यांची शिंग वर्षा बंगल्याबाहेरील लॉनमध्ये खोदकाम करून तिथे पुरली आहेत. असा स्टाफ आणि त्याचे लोक सांगतात, असा खळबळजनक दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. यावर आता शिंदे गटाचे आमदार व मंत्री गुलाबराव पाटील यांनी चांगलाच पलटवार केला आहे. गुलाबराव पाटील म्हणाले, संजय राऊत सडलेला आंबा आहे. त्यांना शिंदे साहेबांशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. शिंगांशिवाय त्यांना काही दिसत नाही. पण ही तीच शिंगे आहेत, ज्यांनी ती गुवाहाटीला जाताना अंगावर घेतली होती. संजय राऊतांनी गंगेत जाऊन स्नान करावे म्हणजे केलेली पाप धुतली जातील. शिवसेना फोडण्याचे मोठे पाप त्यांनी केले आहे, उद्धवजींना काँग्रेस राष्ट्रवादीसोबत नेले, हा कोण भविष्यकार? मुळात संजय राऊत हा वेडा आहे, त्यांना चौकात आणले पाहिजे, आणि शिवसेना स्टाईलने सांगितले पाहिजे, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, सध्या राज्यतात पालकमंत्री पदावरून अद्यापही काही तोडगा निघालेला नाही. यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, पालकमंत्री पदाचा विषय थोडा क्लिष्ठ असला तरी वरिष्ठ नेते तो तिढा आपल्या पातळीवर सोडवतील. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून सध्या महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. रायगडचे पालकमंत्रिपद हे अदिती तटकरे यांना तर नाशिकचे पालकमंत्रिपद हे गिरीश महाजन यांना देण्यात आले होते. मात्र त्यासाठी शिवसेनेचे मंत्री दादा भुसे आणि भरत गोगावले देखील इच्छूक असल्याने तिढा वाढला आहे.

  

Share