अजमेर दर्ग्यात शिवमंदिर असल्याचा दावा:याचिकेवर 20 डिसेंबरपासून सुनावणी, हिंदू सेनेच्या याचिकेसोबत दिले मंदिर असल्याचे दस्तऐवज, पुरावे
उत्तर प्रदेशातील संभल येथील मशिदीच्या सर्वेक्षणानंतर निर्माण झालेल्या वादानंतर अाता अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याचे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी अजमेर दिवाणी न्यायालयात (पश्चिम) याचिका दाखल करून दर्ग्यात श्री संकटमोचन महादेव मंदिर असल्याचा दावा केला आहे. निवृत्त न्यायाधीश हरविलास शारदा यांनी १९११ मध्ये लिहिलेले ‘हिस्टॉरिकल अँड डिस्क्रिप्टिव्ह’ हे पुस्तक त्यांनी संदर्भीय दस्तऐवज म्हणून सादर केले. तसेच दर्ग्याची रचना आणि शिवमंदिराचे पुरावेही दिले. यानंतर न्यायाधीश मनमोहन चंदेल यांनी दावा सुनावणीस योग्य मानला आणि दर्ग्याच्या अंतर्गत व्यवस्था पाहणाऱ्या केंद्र सरकारच्या समितीला अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणला या खटल्यातील पक्षकार म्हणून नोटीस बजावली. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० डिसेंबर रोजी होणार असून त्यात तिघांनाही आपली बाजू मांडावी लागणार आहे. दोन्ही बाजू समोरासमोर असे किती दिवस चालणार… काही लोक हलक्या मानसिकतेमुळे असे बोलत आहेत. असे किती दिवस चालणार? हरविलास शारदा यांच्या पुस्तकाचे जाऊ द्या. पण आम्ही ८०० वर्षांचा इतिहास नाकारायचा का? येथे हिंदू राजांनी पूजा केली. आतील चांदीचे ताट जयपूरच्या महाराजांनी अर्पण केले होते. या सर्व गोष्टी खोट्या आहेत का? १९५० मध्ये न्यायमूर्ती गुलाम सन यांच्या समितीने दर्ग्याच्या प्रत्येक इमारतीची तपासणी केली होती. – नसरुद्दीन चिश्ती, ख्वाजा साहेबांचे वंशज, दर्ग्याचे उत्तराधिकारी आमच्यावर महादेवाचा वरदहस्त… मला अजमेर आणि दिल्लीत धमक्या मिळत आहेत. मी पोलिसांकडे संरक्षण मागितले आहे. मी महादेवाचा भक्त असून त्यांचा माझ्यावर वरदहस्त आहे. म्हणूनच मी दिल्लीहून आल्यानंतर येथे खटला लढत आहे. दोन वर्षे संशोधन केले. ज्ञानवापी आणि मथुरा येथेही याचिका दाखल केल्या होत्या. यानंतर मथुरेत सर्वेक्षण सुरू झाले. आम्ही कायद्याचा मार्ग अवलंबत आहोत. उर्स मेळा शांततेत पार पडावा अशी आमची इच्छा आहे. – विष्णू गुप्ता, याचिकाकर्ते दावा : बुलंद दरवाजात हिंदू-जैन मंदिराचे अवशेष पुस्तकात सेवानिवृत्त न्यायाधीश हरविलास यांनी म्हटले की, अजमेर हे महान योद्धा पृथ्वीराज चौहान यांचे जन्मस्थान आहे. त्यांच्या वंशजांनी येथे मंदिर बांधले. अजमेर मशिदीच्या ७५ फूट उंच बुलंद दरवाजाच्या बांधकामादरम्यान मंदिराचा काही भाग ढिगाऱ्याखाली सापडला होता. हा दरवाजा हिंदू कलाकृतीचा नमुना आहे. त्याच्या घुमटात हिंदू-जैन मंदिराचे अवशेष आहेत. याच्या खाली तळघर किंवा गर्भगृह आहे, ज्यामध्ये शिवलिंग आहे. ग्रंथानुसार येथे एक ब्राह्मण कुटुंब पूजा करत असे. दर्ग्याची शास्त्रीय तपासणी आणि जीपीआर सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.