हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे आक्रमक:हिंदू धर्मात फूट पाडण्याच्या प्रयत्नाला चाप बसवा, थेट सरसंघचालकांकडे केली पत्रातून मागणी

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून मराठी आणि अमराठी असा वाद दिसून येत आहे. त्यात राज्य सरकारने शैक्षणिक धोरणांतर्गत इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाराजी व्यक्त करत विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र पाठवले आहे. यातून मोहन भागवत यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. संदीप देशपांडे यांनी पाठवलेल्या पत्रात मराठ्यांचा इतिहास नमूद केला आहे. तसेच मराठ्यांनी जवळपास 200 वर्ष बहुतांश भारतावर राज्य केले आहे. मात्र मराठ्यांनी कधीच मराठी भाषा त्या त्या प्रांतांवर लादली नाही. इंग्रजांनी हिंदुस्थान मोघलांकडून नाही तर मराठ्यांकडून जिंकला. शिंदे ग्वालियरमध्ये, गायकवाड बडोद्यामध्ये, दक्षिणेत तंजावर येथे मराठ्यांचे राज्य होते. जवळ जवळ 200 वर्ष हिंदुस्थानवर मराठ्यांचे राज्य होते. गुगल नसताना सुद्धा त्यावेळी मराठ्यांना मराठी ही संपर्काची भाषा करावीशी वाटली नाही. उलटपक्षी शिंदे हे ग्वाल्हेर येथे जाऊन सिंधिया झाले, असे या पत्रात म्हटले आहे. मराठी माणूस हा सहिष्णु आहे, त्याचा गैरफायदा घेतला जातोय पुढे संदीप देशपांडे यांनी लिहिले, मराठी माणूस हा सहिष्णु आहे. त्याचा गैरफायदा घेण्यात येत आहे. मराठी माणूस हा सुद्धा हिंदूच आहे. गुजराती, तामिळ बोलणार हा सुद्धा हिंदूच आहे. ख्रिस्ती धर्म वाढवण्यासाठी तामिळ, मल्याळम, कोंकणी ही बोलीभाषा आत्मसात करण्यात आली. हे सर्व सांगण्याचे कारण एकच आहे की धर्म वाढवायचा असेल टिकवायचा असेल तर सर्व भाषांना सामावून घेणे गरजेचे आहे. एका समूहाची भाषा दुसर्‍या समूहावर लादून धर्म वाढू शकत नाही. पाकिस्तानातील बंगाली बोलणारे मुसलमानांनी भाषेआधारीत स्वतंत्र राष्ट्र घेतले हा इतिहास ताजा आहे. हिंदू समाजात फूट पाडण्याचे काम पुढे संदीप देशपांडे पत्रात असे लिहितात, ज्या पद्धतीने सरकार हिंदी भाषेची सक्ती करून हिंदू समाजात फूट पाडण्याचे काम करत आहे. त्यामुळे हिंदू समाज हा एकत्र येण्याऐवजी विखुरण्याचीच शक्यता अधिक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एक वैचारिक अधिष्ठान आहे आणि ही संघटना विचारांच्या आधारावर उभी आहे. म्हणूनच हे सांगण्याचे धाडस करत आहोत. हिंदू धर्मामध्ये फूट पाडण्याच्या या कृतीला आपण चाप बसवाल हा आमचा ठाम विश्वास आहे, अशी अपेक्षा या पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच प्रत्यक्ष भेटीत याविषयीच्या भावना व्यक्त करणार असल्याचे संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे. हिंदी सक्तीकरणाविरोधात मनसे मैदानात उतरली आहे. आता या प्रकरणात संघाने दखल द्यावी, अशी देखील मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे.

  

Share