अत्याचाराच्या घटनेने हिंगोली हादरलं:बासंबात विवाहितेला धमकी देत बलात्कार, सेनगावमध्ये लग्नाचे वचन देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
हिंगोली जिल्ह्यात बासंबा पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात विवाहितेला धमकी देऊन अत्याचार केल्याची तर सेनगाव पोलिस ठाण्यांतर्गत एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बासंबा व सेनगाव पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव पोलिस ठाण्यांतर्गत एका गावातील आखाड्यावरून गौरव करडीले याने एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्यामुलीस पळवून नेले. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात ता. 15 डिसेंबर 2024 रोजी मुलीस पळविल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी या दोघांचाही शोध सुरु केला होता. त्यानंतर सदर मुलगी व गौरव हे दोघे बुधवारी ता. 12 पोलिसांच्या हाती लागले. या प्रकरणात त्या मुलीकडे पोलिसांनी चौकशी केली. यामध्ये त्या मुलीने पोलिसांना जवाब दिला. यामध्ये गौरव याने तिला लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेले तसेच तिच्यावर अत्याचार केल्याचे जवाबात नमुद केले. यावरून पोलिसांनी गौरव याच्या विरुध्द पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक शालीनी नाईक, उपनिरीक्षक एस. बी. स्वामी, जमादार सुभाष चव्हाण पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, अत्याचाराच्या अन्य एका घटनेत बासंबा पोलिस ठाण्यांतर्गत एका गावातील विवाहितेला तिचा पती व मुलास जिवे मारण्याची धमकी देऊन लहु जाधव याने तिच्यावर अत्याचार केला. मात्र सदर घटना घरी कळाल्यानंतर आपला संसार मोडेल या भितीने तिने कुटुंबियांना सांगितले नाही. मात्र याचा गैरफायदा घेऊन लहू याने बुधवारी ता. 12 त्या महिलेसोबत झटापट केली. या प्रकरणात त्या महिलेने कुटुंबियांना सांगितल्यानंतर त्यांनी थेट बासंबा पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी लहु जाधव याच्या विरुध्द गुरुवारी ता. 13 गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक आडे, उपनिरीक्षक मदन गव्हाणे, जमादार खंडेराव नरोटे पुढील तपास करीत आहेत.