हिंगोली जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार कळमनुरीचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्याकडे सोपवण्यात आला असून गुरुवारी ता ३१ त्यांनी पदभार स्वीकारला आहे. हिंगोलीच्या पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील गुरुवारी ता 31 सेवानिवृत्त झाले. गुन्हे शाखेमध्ये कामकाज करताना पाटील यांनी उत्कृष्टपणे कामगिरी बजावली आहे. जिल्ह्यातील जबरी चोरी, दरोडे, खून यासारख्या घटनांना वाचा फोडण्यास त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर गुन्हे शाखेमध्ये पदभार कोणाला दिला जाणार याबाबत चर्चा सुरू होती. दरम्यान पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पदी कळमनुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मोहन भोसले यांची नियुक्ती केली आहे. आज पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या सेवानिवृत्तीनंतर पोलीस निरीक्षक भोसले यांनी पदभार स्वीकारला आहे नांदेड जिल्ह्यात कार्यरत असताना पोलीस निरीक्षक भोसले यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. नांदेड जिल्ह्यातील उमरी तसेच नांदेड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांनी काम केले आहे. याशिवाय दरोडा प्रतिबंधक पथकामध्येही त्यांनी काम करताना नांदेड जिल्ह्यातील दरोडाच्या अनेक घटना उघडकीस आणल्या आहेत. मागील काही दिवसापासून पोलीस निरीक्षक भोसले हे कळमनुरी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांची आता गुन्हे शाखेच्या निरीक्षक पदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर आता जिल्ह्यातील काही जबरी चोरीच्या घटना उघडकीस आणण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे राहिले आहे.