हिंगोलीत मतदार संघनिहाय निरीक्षकांची नियुक्ती:तीनही विधानसभा मतदार संघात होणार प्रत्येकी 14 टेबलवर मतमोजणी

हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी आणि हिंगोली विधानसभा मतदार संघात शनिवारी ता २३ सकाळी ८ वाजल्या पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक फेरीसाठी प्रती मतदार संघ 14 टेबल लावण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे टपाली मतपत्रिकासाठी वेगळे टेबल लावण्यात आलेले असून प्रत्येक टेबलवर मतमोजणीसाठी एक पर्यवेक्षक, एक सहाय्यक पर्यवेक्षक आणि एक सूक्ष्म निरीक्षक यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे. वसमत विधानसभा मतदार संघाची मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी रोड वसमत येथे होणार आहे. कळमनुरी विधानसभा मतदार संघाची मतमोजणी उपविभागीय अधिकारी कार्यालय कळमनुरी येथे होणार आहे. तर हिंगोली विधानसभा मतदार संघाची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, एमआयडीसी, लिंबाळा मक्ता ता. जि. हिंगोली येथे होणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी आणि हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी बुधवार, ता 20 नोव्हेंबर रोजी १०१५ मतदान केंद्रावर मतदान पार पडले आहे. जिल्ह्यात एकूण मतदारांची संख्या 9 लाख 84 हजार 764 मतदारांपैकी 7 लाख 11 हजार 429 मतदारांनी या निवडणुकीत मतदान केले आहे. त्यामध्ये 3 लाख 75 हजार 339 पुरुष, 3 लाख 36 हजार 85 महिला आणि 5 तृतीयपंथीय मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदार संघनिहाय मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती जिल्हयात तीन विधानसभा मतदार संघात शनिवारी ता २३ मतमोजणी होणार आहे. त्यानुसार मतदार संघनिहाय मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. वसमत विधानसभा मतदार संघासाठी हिमांशुकुमार गुप्ता, कळमनुरी विधानसभा मतदार संघासाठी श्रीमती टी. एल. संगीता आणि हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी श्रीमती वंदना राव यांची मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे. मतमोजणी फेरी प्रत्येक मतदारसंघाची मतमोजणी ही १४ टेबलवर होणार असून, जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघात १०२३ मतदान केंद्र आहेत. त्यामुळे साधारणत: वसमत (३२८) कळमनुरी (३५२) आणि हिंगोली (३४३) मतदान केंद्र असल्यामुळे अनुक्रमे वसमत २४ आणि कळमनुरी व हिंगोली विधानसभा मतदारसंघाची २५ फे-यांमध्ये मतमोजणी होणार आहे.

  

Share