हिंगोली शहरातील गणेशवाडी जिल्हा परिषद शाळा लोकसहभागातून हायटेक झाली असून या ठिकाणी आता पाचवी ते आठवीचे विद्यार्थी नियमित अभ्यासक्रमासोबतच संगणकावर स्पर्धा परिक्षेचे धडे गिरवीत आहेत. जिल्हा परिषदेची शाळा जिल्हाभरात कौतूकाचा विषय ठरली आहे. हिंगोली शहरातील गणेशवाडी येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतची शाळा आहे. या शाळेचा परिसर नमनरम्य करण्यात आला असून मैदानावर पेव्हरब्लॉक बसविण्यात आले आहे. शाळेच्या परिसरात वृक्षारोपन करून त्याचे संगोपण केले जात आहे. परिसरात सुमारे ५० पेक्षा अधिक झाडे आहेत. शिक्षकांसोबतच शालेय विद्यार्थी या झाडांचे संगोपन करून त्यांची निगा राखतात. दरम्यान, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांच्या मदतीसोबतच पालकांच्या सहभागाने शाळा हायटेक करण्यात आली आहे. मानव विकास मिशन अंतर्गत शाळेने सुमारे चाळीस टॅब घेण्यात आले आहेत. या शिवाय हायटेक संगणक लॅब तयार करण्यात आली आहे. या संगणक लॅब मध्ये प्रत्येक बेंचवर टॅब ठेवण्यात आले आहे. यामध्ये डेव्हलपमेंट लर्नींग प्रोग्राम हे सॉफ्टवेअर टाकण्यात आले असून त्यातून विद्यार्थी त्यांच्या अभ्यासक्रमासोबतच स्पर्धा परिक्षेसोबतच शिष्यवृत्ती परिक्षेचे धडे गिरवित आहेत. तसेच संगणकाचे ज्ञानही विद्यार्थ्यांना मिळू लागले आहे. या शाळेतील इयत्ता तीसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान दिले जात आहेत. त्यानंतर पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना संगणकाच्या ज्ञानासोबतच अभ्यासक्रम व इतर माहितीही दिली जात आहे. त्यासाठी दररोजच्या तासीकेमध्ये संगणकाच्या तासाचा देखील समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शाळेला भेट देऊन केलेल्या पाहणीमध्ये विद्यार्थ्यांचे संगणकीय ज्ञान व अभ्यासातील प्रगती पाहून शाळेचे कौतूक केले. या शिवाय शाळेसाठी आणखी योजनांचा लाभ देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. शहरातील जिल्हा परिषदेच्या या शाळेची इतर खाजगी शाळेशी होणारी स्पर्धा कौतूकाचा विषय ठरली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न: कुलदीप मास्ट, केंद्र प्रमुख केंद्रातील सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी शिक्षकांचा मोठा सहभाग असून पालकांचेही सहकार्य आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही विद्यार्थ्यांचे जादा वर्ग घेतले जात आहेत.