हिंगोलीत काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा:इच्छूकांच्या गर्दीत माजी नगरसेवक अनिल नेनवाणी यांची वर्णी लागणार

हिंगोली जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर शनिवारी ता. १२ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अनेकांनी जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छा बोलून दाखवली. मात्र माजी नगरसेवक अनिल नेनवाणी यांची वर्णी लागणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसमधे मागील काही दिवसांपासून अंतर्गत धुसफुस सुरु आहे. माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर व विधान परिषद सदस्या डॉ. प्रज्ञा सातव यांचा एक गट असे दोन गट कार्यरत होते. त्यामुळे प्रत्येक वेळी काँग्रेसच्या बैठकीस, आंदोलनास एक गट गैरहजर राहात होता. मात्र या दोन गटामध्ये जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई यांची मात्र चांगलीच अडचण होत होती. दोन्ही गटांना सांभाळतांना देसाई यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यामुळे देसाई देखील मागील काही दिवसांपासून पक्षापासून अलिप्तच होते. मागील दोन ते अडीच वर्षापासून पक्षाचे जिल्हाध्यक्षपद सांभाळणाऱ्या देसाई यांनी अखेर जिल्हाध्यक्षपदाचा राजिनामा दिला आहे. त्यामुळे पक्षाला चांगलाच धक्का बसला आहे. त्यांच्या राजिनाम्यामुळे आता कळमनुरी तालुक्यातच पक्षाला खिंडार पडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकारानंतर आज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्षपदाबाबत चर्चाही करण्यात आली. यामध्ये हिंगोलीचे माजी नगरसेवक अनिल नेनवाणी, सुरेशअप्पा सराफ, माजी जिल्हा परिषद सदस्य विनायक देशमुख, वसमतचे माजी नगराध्यक्ष अब्दुल हाफीज यांच्यासह आणखी काही इच्छुकांनी जिल्हाध्यक्षपदी आपलीच वर्णी लागावी, अशी इच्छा बोलून दाखवली. मात्र या इच्छूुकांच्या भाऊगर्दीमध्ये माजी नगरसेवक अनिल नेनवाणी यांचे पारडे जड आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करणारा तसेच माजी खासदार ॲड. राजीव सातव यांचे विश्वासू कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख असून त्यांनी शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्यांच्या प्रश्नावर वेळोवेळी आंदोलन देखील केले आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदी त्यांचीच वर्णी लागणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले. या संदर्भात देसाई यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजिनामा दिल्याचे सांगितले. मात्र एका कार्यक्रमात असल्यामुळे नंतर बोलतो असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी राजिनामा का दिला हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

  

Share