गृहभेटी, रांगोळी स्पर्धा, पथनाट्य, संवादातून घडवणार मतदार जागृती:राष्ट्रीय सेवा कार्य समजून प्रामाणिकपणे काम करावे- डॉ. नाईक‎

पाथर्डी १९ नोव्हेंबरपर्यंत शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात मतदार शपथ, रांगोळी स्पर्धा, पथनाट्य, विद्यार्थी पालकांकडून संकल्पपत्र भरून घेणे, गृह भेटीतून मतदान जागृती अभियान, मतदानाच्या कर्तव्य विषयक पत्रकांचे वाटप, मतदान घडून आणण्याविषयी लोक जागृती फेऱ्या, नवमतदारांशी संवाद अशा विविध कार्यक्रमांमधून मतदार जागृती घडवण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगरपालिका आदी ठिकाणी मतदान शपथ घेण्यात आली. याप्रसंगी तहसीलदार डॉ. उद्धव नाईक , नोडल अधिकारी रामनाथ कराड, शाहीर भारत गाडेकर, बिपीन खंडागळे, राजेंद्र चव्हाण, बाळासाहेब मरकड, विस्तार अधिकारी दत्तात्रेय रानमळ, पालिकेचे मुख्य अधिकारी संतोष लांडगे आदी स्वीपच्या सदस्यांनी सामूहिक शपथ घेतली. यातील सांस्कृतिक कलाकारांनी मतदान विषयक जागृती घडवणारे व कर्तव्याची जाणीव करून देणारी उत्कृष्ट गीत सवाद्य सादर केले. मिशन ७५ टक्के अभियान यशस्वी करण्यासाठी निवडणूक विभागाशी संबंधित सर्व यंत्रणा प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद मते यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे. तहसीलदार डॉ. नाईक म्हणाले, मतदारांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करणे म्हणजे कर्तव्याचा व राष्ट्रीय सेवा कार्याचा एक भाग समजून सर्व अधिकारी, कर्मचारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावे. या कामातून मिळणारा आनंद हीच आपल्या कामाची खरी पावती ठरेल. डॉ. नाईक म्हणाले, मतदान करणे म्हणजे मतदाराचे कर्तव्य असून या कर्तव्यामध्ये कुठल्याही कारणाने कसूर न करता प्राधान्याने मतदान करावे. मतदान प्रक्रियेत भाग घेतल्यास राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव अधिक मजबूत होते. निर्णय प्रक्रियेत सहभागी झाल्याने जबाबदारीची जाणीव वाढून राष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीसाठी मतदान करणे आवश्यक आहे. कुठल्याही प्रकारे सहली, प्रवास, लग्नकार्य आदींना प्राधान्य न देता मतदानाच्या दिवशी लवकरात लवकर मतदान करून इतरांना प्रेरित करावे, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन बिपीन खंडागळे यांनी केले. आभार बाळासाहेब आंबेडकर यांनी मानले. मतदान घडवून आणण्यासाठी प्रयत्न करा मतदारांनीच मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त केल्यास त्याचा परिणाम अधिक प्रभावीपणे साधला जाऊ शकतो. या प्रक्रियेत भाग घेतल्यास व्यापक दृष्टिकोन वाढून विचार करण्याची सकारात्मक क्षमता सुद्धा वाढते. म्हणून प्रत्येकाने मतदान करावे. मतदान घडवून आणावे. यासाठी विशेष मोहीम सुरू असल्याचे तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांनी सांगितले. तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांनी स्वीप अधिकाऱ्यांना मतदानाची शपथ दिली.

  

Share