वाल्मीक कराडची किती संपत्ती ट्रान्सफर झाली:ईडीने चौकशी करावी, अंबादास दानवेंची मागणी; सरकारही साधला निशाणा

वाल्मीक कराडची संपूर्ण मालमत्ता जप्त करण्याची हालचाल एसआयटीने सुरु केली आहे. यासाठी एसआयटीने परवानगी मागण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या निर्णयाचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी स्वागत करत वाल्मीक कराडची किती संपत्ती ट्रान्सफर झाली, याची ईडीने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मीक कराड विरोधातील अनेक गोष्टी समोर येत आहे. रोज नव्या गुन्ह्यात त्यांचे नाव समोर येत असून राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील बेनामी मालमत्ता समोर येत आहे. वाल्मीक कराडची नेमकी कुठे आणि किती संपत्ती आहे याची सर्व माहिती एसआयटीने गोळा केली आहे. याचे रेकॉर्ड समोर येताच आणखी मालमत्ता सील केल्या जातील. एसआयटीने कराडची संपूर्ण मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली सुरु केली आहे. काय म्हणाले अंबादास दानवे?
संपत्ती जप्त करण्याचा निर्णय चांगला आहे, पण वाल्मीक कराड याची किती संपत्ती ट्रान्सफर झाली आहे, याची ईडीने चौकशी करावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे. वाल्मीक कराडच्या स्वतःच्या नावावर किती संपत्ती आणि दुसऱ्याच्या नावावर किती हे कोण शोधणार? असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. वाल्मीक कराडने खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक दिवस पोलिसांना गुंगारा दिला होता. जेवढे दिवस तो फरार होता, त्याकाळात त्याने आपल्या नावावरची किती संपत्ती ट्रान्सफर केली किंवा झाली, याचा तपास होणे गरजेचे आहे. त्यावर कारवाई झाली पाहिजे, असेही अंबादास दानवे म्हणाले. संपूर्ण तपासावर निश्चितपणे संभ्रम
या संपूर्ण प्रकरणात सरकार पक्षपातीपणे वागत आहे. इतर वेळी तत्परतेने कारवाई करणारी ईडी हजारो, कोट्यावधी रुपयांची मालमत्ता असणाऱ्या वाल्मीक कराडला साधी नोटीसही देत नाही. साधा तपास करत नाही, त्यामुळे या संपूर्ण तपासावर निश्चितपणे संभ्रम आहे, असा आरोप दानवे यांनी केला. धनंजय मुंडेंवरही कारवाई करायला हवी
सीसीटीव्ही व्हिडिओ मीडियाला मिळतात पण पोलिसांना माहित होत नाही? या प्रकरणाचा तपास पोलिस व्यवस्थित करत नाहीत, असा आरोप करत वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे अंबादास दानवे म्हणाले. धनंजय मुंडेंवरही कारवाई करायला हवी, अशी मागणी करत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा होता आणि पक्षानेही तो घ्यायला हवा होता, असेही दानवे म्हणाले. हे ही वाचा… वाल्मीक कराडच्या संपत्तीवर टाच?:माहिती घेत सर्व मालमत्ता जप्तीसाठी एसआयटीचा विशेष न्यायालयात अर्ज बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. एसआयटीने कराडची संपूर्ण मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली सुरु केली आहे. पूर्ण बातमी वाचा…

  

Share