‘होय मी नाराज’; छगन भुजबळ यांची संतप्त प्रतिक्रिया:राज्यसभेची ऑफर धुडकावली; मनधरणीचे प्रयत्न, पक्षात महत्त्वाचे पद मिळणार

‘होय मी नाराज आहे’, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘होय मी नाराज आहे, पुढे काय करणार? मी पुन्हा सांगतो मी नाराज आहे’ असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर भुजबळ यांनी हे उत्तर दिले आहे. मात्र, छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रयत्न सुरू केले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता पक्ष संघटनेमध्ये भुजबळ यांना महत्त्वाचे पद देण्यात येणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. छगन भुजबळ जर नाराज आहेत तर तुमचे अजित पवार किंवा सुनील तटकरे यांच्याशी काही बोलणे झाले आहे का? असा प्रश्न देखील भुजबळ यांना विचारण्यात आला होता. मात्र, मला त्याची काही आवश्यकता वाटली नसल्याचे भुजबळ यांनी सांगितला आहे. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावलले काय किंवा फेकले काय? कोणाला काय फरक पडतो? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आयुष्यात अनेकदा मंत्रीपदे मिळाली आहेत किंवा किती वेळा ती गेली देखील आहेत. परंतु छगन भुजबळ अद्याप संपला नाही. तुम्ही मंत्रीपदावर मला प्रश्न विचारण्याऐवजी ज्यांनी डावलले, त्यांना विचारायला हवे, असे देखील भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. आजा राज्यसभेवर जाणार नाही – भुजबळ आठ दिवसांपूर्वी मला राज्यसभेवर जा, असे पक्षाकडून सांगण्यात आले होते. अशी माहिती देखील भुजबळ यांनी दिली आहे. मी पूर्वी राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक होतो. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर आता मी राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक नसल्याचे मी पक्षाला स्पष्टपणे कळवले होते, असे देखील भुजबळ यांनी सांगितले आहे. मला माझ्या मतदारांनी निवडून दिले आहे. मग आता मी जर राज्यसभेवर गेलो, तर ती माझ्या मतदारांची प्रतारणा ठरेल, असा दावा त्यांनी केला आहे. थेट नाराजी व्यक्त ओबीसींचा लढा आणि लाडकी बहिण योजनेमुळे महायुतीला राज्यात चांगले यश मिळाले असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. मी ओबीसींच्या हक्कासाठी लढत होतो आणि पुढेही लढत राहणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले आहे. या माध्यमातून भुजबळ यांनी पक्षाकडे थेट आपली नाराजी व्यक्त केली आहे. नाशिककडे रवाना राज्य मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांना निश्चित स्थान मिळेल असे मानले जात होते. मात्र मंत्रिमंडळात भुजबळ यांना डावल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच आता भुजबळ हे नागपूर अधिवेशन अर्धवट सोडत नाशिक कडे रवाना होणार असल्याची देखील चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चेला आणखीनच बळ मिळाले आहे. जातीचे राज्यकारण – संजय राऊत छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळ असताना मिळाल्यावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे. यामागे मात्र जातीचे राज्यकारण असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. भुजबळ यांनी शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांची साथ सोडली. हे सगळ्यांसाठीच क्लेशदायक होते. मात्र राजकारणामध्ये ज्याला – त्याला आपल्या कर्माची फळे मिळत असतात, अशी टीका देखील राऊत यांनी केली आहे. ओबीसी नेता मंत्रिमंडळात हवा होता – वडेट्टीवार छगन भुजबळ ओबीसी समाजाचे नेतृत्व करतात. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांचा वापर करण्यात आला आणि नंतर मात्र त्यांना बाजूला करण्यात आले, असल्याची टीका काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. छगन भुजबळ हे ओबीसी आक्रमक चेहरा आहेत. त्यामुळे ते मंत्रिमंडळात हवे होते, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

  

Share