मोदींच्या ‘एक है, तो सेफ हे’ वक्तव्यावर पटोलेंची टीका:म्हणाले – पंतप्रधान पदावरील व्यक्तीने असे वक्तव्य करणे लोकशाहीला कलंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात एक है, तो सेफ हे असे विधान केले होते. या विधानावार नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे. नरेंद्र मोदी म्हणून ते असे विधान करू शकतात. पण पंतप्रधान पदावर असलेल्या व्यक्तीने असे वक्तव्य करणे, लोकशाहीला कलंक आहे, असे नाना पटोले म्हणाले. लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे अभय साळुंखे यांच्या प्रचारसभेच्या निमित्ताने ते माध्यमांशी बोलत होते. नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. पंतप्रधान पदावर असलेल्या व्यक्तीने देशातील लोकांमध्ये फूट पाडण्याची मानसिकता निर्माण केलेली आहे. नरेंद्र मोदी यांना देश सांभाळता येत नाही. ते घाबरून गेले आहेत, त्यामुळेच त्यांच्याकडून अशी विधाने येत आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली. …त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील, असे संकेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या सभेच्या भाषणात दिले होते. यावरही नाना पटोले यांनी भाष्य करत देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाचे आमदार निवडूनच येणार नाहीत, तर मग ते मुख्यमंत्री कसे होतील, असे पटोले म्हणाले. भाजपचे खायचे अन् दाखवायचे दात वेगळे
देशात हिटलरशाही सुरू आहे. भाजपचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहे. दाऊदचा सोबती म्हणून ज्या नवाब मलिकांना तुरुंगात टाकले, तेच आज महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यामुळे भाजपचा खरा चेहरा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आला आहे, असा घणाघातही नाना पटोले यांनी केला. बदलापूरच्या शाळेत ब्ल्यू फिल्म तयार केल्या जायच्या
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी बोलताना बदलापूरच्या शाळेत ब्ल्यू फिल्म तयार केल्या जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पटोले यांनी हा आरोप आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांच्या हवाला देऊन केला आहे. तिरोडकर यांनी याबाबत हायकोर्टात याचिका दाखल केली असल्याचा दावाही पटोले यांनी केला. बदलापूरच्या शाळेत केवळ ब्लू फिल्मच नव्हे, तर अवयव विक्रीचे अनैतिक व्यवहारही चालतात. मात्र, ही शाळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याने या प्रकरणावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

  

Share