शरद पवारांचा ‘बटेंगे तो कटेंगे’वर हल्ला:भाजपला खडसावत म्हणाले – समाजात तेढ निर्माण करू नये याचे साधे भान सत्ताधारी पक्षाला नाही

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगेच्या नाऱ्यावरून सत्ताधारी भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे. सत्ताधारी पक्षाची टोकाची जातीयवादी भूमिका आहे. ही भूमिका या निमित्ताने पुन्हा एकदा पुढे आली आहे. समाजात तेढ निर्माण करू नये याचे साधे भान या पक्षाला नाही, असे ते म्हणालेत. महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचा जोर वाढला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी बटेंगे तो कटेंगे हा नारा दिला होता. त्यांच्या या विधानानंतर भाजपने हा नारा उचलून धरला. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी शनिवारी नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी भाजपला समाजात तेढ निर्माण करू नये याचे भान नसल्याचे स्पष्ट केले. शरद पवार म्हणाले, सत्ताधारी पक्षाची जातीयवादी भूमिका आहेच. पण ती या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आली आहे. निवडणुका येतात आणि जातात, पण जाती-धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम कुणीही करू नये. याचे साधे भान भाजप व त्याच्या मित्रपक्षांना नाही. ही निवडणूक जातीयवादाकडे नेण्यासाठी येथे योगी आदित्यनाथ यांना आणले जात आहे. नांदेड उत्तरमध्ये ठाकरेंऐवजी काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा शरद पवार यांनी यावेळी नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे स्पष्ट केले. तसेच नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार अब्दुल सत्तार हेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्याचे ठणकावून सांगितले. या मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटाने संगीत डक यांना उमेदवारी दिली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार म्हणाले, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत आम्हाला चिंतेचे कोणतेही कारण नाही. येथे महाविकास आघाडीच्या उमेदवाराची स्थिती चांगली आहे. येथील मतदार भाजपच्या विचारसरणीला पाठिंबा देणार नाहीत याचा आम्हाला विश्वास आहे. नांदेड उत्तर मतदारसंघात ठाकरे गटाने काँग्रेस उमेदवाराविरोधात उमेदवार दिला आहे. पण त्या ठिकाणी अब्दुल सत्तार हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. वसमतच्या सभेत कुणी तरी माझ्या हातात एक चिठ्ठी दिली होती. त्यामुळे मी चुकून संगीता डक यांचे नाव घेतले. परंतु आम्ही अब्दुल सत्तार यांच्या पाठीमागे आहोत हे सर्वांनी लक्षात घ्यावे.

  

Share