रशिया – युक्रेन प्रमाणे राज्यात 3 पक्षांत युद्ध:अजूनही पूर्ण सरकार नाही; म्हणजे सर्व काही ठीक झालेले नसल्याचा संजय राऊत यांचा दावा

भारतीय जनता पक्षाने देशांमध्ये सुडाचे राजकारण सुरू केले आहे. ईडी, सीबीआय आणि पोलिसांचा आम्ही कधीही वापर केला नसल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मात्र, आता त्यांना त्याची उपरती आली असेल, तर त्याचे आम्ही स्वागत करू, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. सध्या रशिया आणि युक्रेन प्रमाणे राज्यातील तीन पक्षांमध्ये युद्ध सुरू असल्याचा दावा देखील त्यांनी केला. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतीलच असा दावा मी कालच केला होता. किंवा त्यांच्याशिवाय शपथविधी घेण्याची तयारी भाजपने केली होती. याची माहिती माझ्याकडे आहे. माझ्याकडे माहिती असल्याशिवाय मी बोलत नसल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. त्यांच्या पक्षात आणि गटात देखील आमचे हितचिंतक असल्याचे देखील राऊत यांनी म्हटले आहे. शिंदे यांचा अडेटट्टूपणा कायम राहिला असता, तर त्यांच्याशिवाय पुढे जा असे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी कळवले होते, असा दावा देखील राऊत यांनी केला आहे. या आधी राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्री नंतर उपमुख्यमंत्री पद स्वीकारलेले होते. देशांमध्ये अनेक ठिकाणी असे मुख्यमंत्र्यांनी मंत्री पदे स्वीकारल्याची उदाहरणे आहेत. राज्यात देखील अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री राहिलेले असताना देखील उद्धव ठाकरे यांच्या काळात मंत्री म्हणून काम केले. निलंगेकरांचे देखील उदाहरण समोर असल्याचे राऊत यांनी सांगितले. शपथविधीच्या व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाच्या सहकारी मित्र पक्षांचा वावर हा मांडलीकांप्रमाणे होता, असा आरोप देखील राऊत यांनी केला आहे. तेथे देशाचे पंतप्रधान, केंद्रातील सर्व मंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे ते होणारच होते, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात बहुमत असून देखील नेत्यांचा शपथविधी होण्यासाठी इतके दिवस लागले, असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. 225 पेक्षा जास्त आकडा असून देखील त्यांना शपथविधीसाठी इतके दिवस लागले, यातही केवळ तीन लोकांनी शपथ घेतली आहे. इतक्या दिवसानंतर महाराष्ट्राला अजून संपूर्ण मंत्रिमंडळ मिळालेले नाही. त्यामुळे अजूनही सर्व काही ठीक झालेले नसल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.

  

Share