पंतप्रधान मोदींच्या सभेनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल:टिळक रस्त्यावर स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त मंगळवारी (१२ नोव्हेंबर) पुण्यातील मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. मोदी यांची जाहीर सभा टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार असून, या भागातील रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत अशी माहिती पुणे वाहतूक पोलिसांनी दिली आहे. सदाशिव पेठेतील विजयानगर कॉलनी परिसरातील ना. सी. फडके चौक ते नाथ पै चौक दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद राहील. वाहनचालकांनी ना. सी. फडके चौकातून डावीकडे वळून नीलायम चित्रपटगृहमार्गे पर्वती उड्डाणपुलाखालील रस्त्याने सिंहगड रस्त्याकडे जावे. नाथ पै चौकातून वाहनचालकांनी सरळ सिंहगड रस्त्याकडे जावे. बाबुराव घुले पथ, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, आंबील ओढा परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद राहतील. वाहनचालकांनी टिळक आयुर्वेद महाविद्यालय चौकातून डावीकडे वळून जॉगर्स पार्कमार्गे शास्त्री रस्त्याकडे जावे. तेथून इच्छितस्थळी जावे. साने गुरुजी पथ परिसरात (टिळक रस्ता चौक ते नीलायम चित्रपटगृह) सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. टिळक चौक ते भिडे पूल चौक दरम्यान एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी काकासाहेब गाडगीळ पूल (झेड ब्रीज) डावीकडे वळून भिडे पुल चौकातून उजवीकडे वळून इच्छितस्थळी जावे. गरुड गणपती चैाक ते भिडे पूल चौक दरम्यानची वाहतूक बंद राहणार आहे. वाहनचालकांनी गरुड गणपती चौकातून डावीकडे वळून टिळक चौकातून वळून केळकर रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे. डेक्कन जिमखाना परिसरातून भिडे पूलमार्गे केळकर रस्त्यावर येण्यास वाहनांना मनाई करण्यात आली आहे. वाहनचालकांनी नदीपात्रातील रस्त्याने इच्छितस्थळी जावे. सोमवारी मध्यरात्री बारानंतर शहरात येणाऱ्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्री बारापर्यंत जड वाहनांनी शहरात येण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रमुख रस्त्यांवर वाहने लावण्यास मनाई पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त मंगळवारी सायंकाळी सहा ते रात्री बारापर्यंत जंगली महाराज रस्ता (संचेती चौक ते खंडोजीबाबा चौक), येरवड्यातील गोल्फ क्लब चौक ते डॉ. आंबेडकर चौक, टिळक चौक ते नाथ पै चौक (शास्त्री रस्ता), खंडोजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक (फर्ग्युसन रस्ता) या रस्त्यांवर दुतर्फा सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे, असे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिले आहेत. मोहोळ, पाटील यांच्याकडून सभास्थळाची पाहणी सभा महाविद्यालय या ठिकाणी महायुतीची जाहीर प्रचार सभा संपन्न होणार आहे. या सभेकरीता एक लाख लोक उपस्थित राहतील यादृष्टीने महायुती प्रयत्नशील असून सभेची जय्यत तयारी करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुतीचे नेते या सभेस उपस्थित राहणार आहे. सोमवारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ ,मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेश महामंत्री राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रवक्ते संदीप खर्डेकर, श्रीनाथ भिमाले, अजय खेडकर, शिवसेना नेते किरण साळी यांनी सभा स्थळी भेट देऊन तयारीचा आढावा घेतला आणि आवश्यक त्या सूचना केल्या.