उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट:भाजप राष्ट्रवादीसोबत जाणार होती, बैठकीत उद्योगपती गौतम अदानी होते

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा झालेला पहाटेच्या शपथविधीवर मोठा गौप्यस्फोट केला आहे. एका यूट्यूब चॅनलला मुलाखत देताना अजित पवार म्हणाले, भाजप आणि राष्ट्रवादीला एकत्र आणण्यासाठी महत्त्वाची बैठक पार पडली होती त्यात उद्योगपती गौतम अदानी देखील असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादी आणि भाजपचे सरकार राज्यात आणण्यासाठी दिल्लीत पाच बैठका झाल्या. एक बैठक उद्योगपती गौतम अदानींच्या घरी झाली. यामधील एका बैठकीला अमित शाह, गौतम अदानी, देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल, पवार साहेब आणि आपण स्वतः उपस्थित होतो. त्या गोष्टी सगळ्यांनाच माहिती आहेत, असे अजित पवार म्हणाले. पुढे अजित पवार म्हणाले, त्या गोष्टी आता काढून काही उपयोग नाही. त्या गोष्टीचे सर्व दोष माझ्यावर आला. त्या गोष्टीची संपूर्ण जबाबदारी मी घेतली आणि इतर नेत्यांना वाचवले, असे स्पष्टीकरण पवारांनी दिले आहे. पुढे अजित पवारांना त्या वेळी शरद पवारांच्या मनात काय होते, असा प्रश्न विचारण्यात आला, त्यावर ते म्हणाले, शरद पवारांच्या मनात काय आहे हे जगातील कोणताही व्यक्ती सांगू शकत नाही. आमच्या काकी सुद्धा सांगू शकत नाहीत. पाच वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. मात्र अजूनही याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू असते. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना आणि भाजप युतीला बहुमत मिळाले होते. मात्र मुख्यमंत्रीपदावरून मतभेद निर्माण झाले होते. त्यावेळी महाविकास आघाडी निर्माण करण्याची देखील चर्चा सुरू होती. त्याच दरम्यान, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे शपथविधी केली आणि फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्री बनले होते. हे सरकार काही तासच शिल्लक राहिले आणि अजित पवार पुन्हा माघारी परतले होते.

  

Share