नागपुरात मंत्र्यांसाठी 40 बंगले सज्ज ठेवण्याच्या सूचना:मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार, हिवाळी अधिवेशनापूर्वीच मंत्र्यांचा होणार शपथविधी?
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा एकदा स्थापन झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली तसेच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आता मंत्रिमंडळाचा विस्तार देखील लवकरच होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच हिवाळी अधिवेशन देखील सुरू होणार आहेत त्यामुळे नागपूर येथे मंत्र्यांसाठी 40 बंगले सज्ज ठेवण्याच्या सूचना देखील देण्यात आल्याचे समजते. हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याचे समजते. यामुळे आता नागपूर येथे घडामोडींना वेग आला असल्याचे दिसत आहे. मंत्रिमंडळ विस्तार लक्षात घेत नागपूरमध्ये मंत्र्यांसाठी 40 बंगले सज्ज करून ठेवण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय उपाध्याय यांनी याबद्दल माहिती दिली आहे. उपविभागीय अभियंता संजय उपाध्याय यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मंत्रिमंडळ विस्तार लक्षात घेता नागपूरमध्ये मंत्र्यांसाठी 40 बंगले सज्ज करून ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उद्यापर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनात मंत्र्यांसाठी निवासाची व्यवस्था झाली आहे. मंत्र्यांच्या नावाच्या पाट्यांचे ढाचे तयार असल्याचे उपाध्याय यांनी सांगितले आहे. पुढे संजय उपाध्याय यांनी सांगितले, उद्या मंत्र्यांच्या नावांची यादी आली की बंगल्यांवर नेमप्लेट लावण्यात येईल. निवास समितीची आजच बैठक झाली. या बैठकीत मंत्र्यांसाठी बंगले तयार ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. रवी भवन परिसरात कॅबिनेट मंत्र्यांसाठी 24 बंगले सज्ज आहेत. तर नाग भवन परिसरात राज्य मंत्र्यांससाठी 16 बंगले सज्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, सध्या महायुतीमधील कोणत्या नेत्यांना कोणते खाते मिळणार तसेच कोणाला मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांची शपथविधी पार पडली मात्र मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झाला नसल्याने सर्वांनाच मंत्रिपद कोणाला मिळणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.