जगण्याची वाट असावी प्रामाणिक, नाहीतर ‘दुसरा अंक’ राहिल अपूर्ण, ‘दुसरा अंक’ नाटकाद्वारे दिला सामाजिक संदेश, चांगल्या अभिनयामुळे मिळाली प्रेक्षकांची वाहवा

एखाद्याला सत्व आणि तत्वाची पाऊलवाट चालायची असेल, तर त्याला योग्य विचारांची सोबत ठेवावी लागते. यशोशिखरावर चालण्यासाठी नैतिक मूल्यांचा विचार करावा लागतो. विवेकाची कास धरावी लागते. या प्रवासाची वाट जितकी प्रामाणिक असेल, तितकी त्या व्यक्तीची उंची उंचावत असते. नाहीतर तडजोड करण्याच्या नादात माणूस सर्वस्व गमावून बसतो.. ‘दुसरा अंक’ नाटकाने दिलेला हा संदेश. घोडेगाव (ता. नेवासा) येथील समर्थ युवा प्रतिष्ठान व दिग्दर्शक संदीप येळवंडे यांनी मंगळवारी (३ डिसेंबर) रवींद्र धिंगेकर लिखित ‘दुसरा अंक’ हे नाटक सादर केले. त्यातून प्रख्यात व तत्वनिष्ठ लेखकाची शोकांतिका दाखवण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. फ्लॅशबॅकमधून नाटकाचं कथानक उलगडतं. नाट्य क्षेत्रातील व्यावसायिक स्पर्धेतही उल्हास नावाचा लेखक स्वत:ची तत्व जपत असतो. त्याला पत्नी नेत्राची चांगली साथ असते, पण बँकेतील नोकरी गेल्यानंतर आर्थिक चणचण व पत्नीचं आजारपण बळावत जातं, म्हणून हतबल उल्हासला तत्वांना मुरड घालावी लागते. म्हणावं तसं यश मिळत नाही व पत्नीला वाचवू शकलो नाही, याचं दु:ख उराशी बाळगत तो आयुष्यभर पश्चातापाच्या गर्तेत खोल जातो. तिची अखेरची इच्छा असलेल्या नाटकाचा दुसरा अंकही अपूर्णच राहतो व शेवटी त्याचाही दु:खद अंत होतो. इथे नाटक संपतं. हौशी राज्य नाट्य स्पर्धेत या नाटकाची कामगिरी दमदार आहे. २०१५ मध्ये औरंगाबाद व २०२३ मध्ये सोलापूर विभागात सर्वोत्कृष्ट द्वितीय, उत्कृष्ट दिग्दर्शनाचे द्वितीय व उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार या नाटकाला मिळालेला आहे. त्यामुळे या संहितेकडे ओढा असणे साहजिक असले, तरी चांगले पाठांतर व सशक्त अभिनयाची जोडही गरजेची होती. प्रचंड ताकदीने नेत्राची भूमिका साकारताना डॉ. भावना रणशूर यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. ‘मॅनेजर नाथा’ मोहन औटी यांनी व वयोवृद्ध लेखक सुरेश चौधरी ही भूमिका चांगली साकारली. जयरामच्या भूमिकेत योगेश रासने ठीक होते. मुख्य भुमिकेचं आव्हान संदीप येळवंडे यांनी पेललं. त्यांचं पाठांतर चांगलं आहे, पण दीर्घ स्वगत करताना लय टिकवणं त्यांनाही थोडं जड गेल्याचं जाणवलंच. काही पात्रांनी उच्चारावर लक्ष द्यायला हवं होतं. नेपथ्य (राजेंद्र पाटोळे) अप्रतिम, प्रकाशयोजना (गणेश लिमकर) उत्कृष्ट व पार्श्वसंगीतही (विशाल बोरुडे) उत्तम. रंगभूषा व वेशभूषाही चांगल्या. सर्व कलाकारांनी प्रामाणिक सादरीकरण केल्याने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. शुक्रवारी रात्री ८ वाजता नाटक : कन्यादान { लेखक : विजय तेंडुलकर { दिग्दर्शक : अनंत जोशी { नाट्यसंघ : नाट्याराधना, अहिल्यानगर

  

Share