जिथे संपादन होणार, तिथल्या जमिनी विकू नका:मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना भावनिक आवाहन, म्हणाले – दलालांच्या भानगडीत पडू नका
जिथे जमिनीचे संपादन होणार आहे, तेथील शेतकऱ्यांनी जमीन विकली नाही पाहिजे, दलालांच्या भानगडीत पडले नाही पाहिजे, असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना केले. कोणीतरी अचानक तुमची जमीन विकत घेतोय तर हा जमीन का घेतोय याची माहिती घ्या. कारण जमिनीचा पैसा हा थेट शेतकऱ्यांनाच मिळाला पाहिजे, अशी आमची भावना असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. ते अमरावतीत बोलत होते. अमरावती येथील विमानतळाच्या लोकार्पणानंतर विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदानाचे वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात भाषण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आणि प्रकल्पग्रस्तांना उपरोक्त आवाहन करत भावनिक साद घातली. नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस? आम्ही जमीन अधिग्रहणाची घोषणा केली की कोणीतरी धन्नाशेठ येतो आणि शेतकऱ्यांकडून जमिनी विकत घेतो. त्यानंतर, 5 पटीने तेथे पैसे कमावतो. त्यामुळे, ज्याठिकाणी जमिनीचे अधिग्रहण होतेय, त्याठिकाणी तुम्ही जमिनी विकू नका, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना केले. शेतकऱ्यांनी जमीन विकली नाही पाहिजे, दलालांच्या भानगडीत पडले नाही पाहिजे. कोणीतरी अचानक तुमची जमीन विकत घेतोय, तर हा जमीन का घेतोय, याची माहिती घ्या. कारण, शेतकऱ्यांना पैसे मिळावे, व्यापाऱ्यांना नको, अशी आमची भावना असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. कोणत्याही दलालाच्या फंदात पडू नका आम्ही असा कायदा केला आहे की, जमिनी संपादनावेळी शेतकऱ्यांना जास्त मोबदला मिळाला पाहिजे. 2006 ते 2013 मधील शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत ही योजना सुरू राहील, ती बंद होणार नाही. काही अडचण आल्यास आमदार आणि मंत्र्यांशी संपर्क साधावा, कोणत्याही दलालाच्या फंदात पडू नये, असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केले. 2006 ते 2013 काळात शेतकऱ्यांची फसवणूक झाली विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची संधी मला तुमच्या आशीवार्दाने मिळाली. सन 2006 ते 2013 च्या काळात येथील शेतकऱ्यांची फसवणूक झाली. सर्व प्रकारचे हक्क गोठवण्याचे काम झाले, कोणाला एक लाखाचा भाव देऊन हक्क गोठवण्याचे काम झाले. मग मी मुख्यमंत्री झालो तेव्हा नवीन जीआर काढला आणि थेट खरेदी सुरू केली. मग अनेकांना कळले की, आमची फसवणूक झाली आहे. सुरुवातीच्या काळात अनेक बैठका झाल्या, त्या लोकांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली. मग, युतीचे सरकार आले तेव्हा अनेक आंदोलनंही झाले, काही आत्महत्याही झाल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.