ज्यांनी हल्ला केला, त्या सर्वांना टिपून टिच्चून काढा:आमदार जितेंद्र आव्हाड संतापले; कारवाईसाठी मोदी सरकारला जाहीर पाठिंबा
पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये मंगळवारी सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला, ज्यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक इटालियन आणि एक इस्रायली पर्यटक आणि दोन स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. उर्वरित पर्यटक गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि ओडिशातील आहेत. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच देश बांधवांवर हल्ला करणाऱ्या सर्वांना टिपून टिच्चून काढा म्हणत, त्यासाठी जाहीर पाठिंबा असल्याचेही म्हटले आहे. या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी एका पोस्टच्या माध्यमातून भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला, त्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. ‘सध्या सुट्यांचा हंगाम सुरू असल्याचा फायदा घेत भारतीय संघ राज्याचा अविभाज्य घटक असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये सर्व सामान्य पर्यटकांवर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला त्याचा तीव्र निषेध….. सोबतच ज्यांनी आमच्या देश बांधवांवर हल्ला केला त्या सर्वांना टिपून टिच्चून काढा, जाहीर पाठिंबा….’ राज ठाकरे यांनीही दिला पाठिंबा या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केंद्र सरकारला कडक कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. इतकेच नाही त्यासाठी मनसे सरकारच्या पाठीशी पूर्णपणे उभी असल्याचा विश्वासही राज ठाकरे यांनी दिला आहे. या संदर्भात राज ठाकरे यांनी एका पोस्टच्या माध्यमातून मनसेची भूमिका स्पष्ट केली आहे. 1972 साली म्युनिक ऑलिम्पिकच्या वेळेस इस्रायली खेळाडूंवर पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी हल्ला केला… यानंतर इस्रायलने या अतिरेक्यांना, या हल्ल्याच्या सूत्रधारांना अशा पद्धतीने मारलं होतं की पुढे दीर्घकाळ पॅलेस्टिनी लोकांच्या मनात दहशत बसली होती. तशीच दहशद येथे देखील बसवण्याची अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.