उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दादरमधील कबुतरखाना बंद करण्यात आला होता. यावरून जैन समाजाच्या वतीने जैन मंदिरामध्ये सर्वधर्मीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या संदर्भात काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर आज ही सभा रद्द करण्यात आली होती. मात्र सकाळी या सभेसाठी अचानक जैन समाज आक्रमक झाला आणि त्यांनी कबुतर खाण्यावरील झाकण्यात आलेली ताडपत्री काढून टाकली. यामुळे जैन समाज बांधव आणि पोलिसांमध्ये काही काळ झटापट देखील झाली. त्यामुळे येथे तणाव देखील निर्माण झाला होता. दादरमधील कबुतरखाना परिसरात जैन समाज अचानक आक्रमक झालेला पाहिला मिळाला. वास्तविक या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जैन समाजाच्या बाजूने निर्देश दिले होते. या संदर्भात उच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. मात्र, तो पर्यंत कबुतर उपाशी मरतील, असे जैन समाजाच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे तात्काळ ताडपत्री हटवून कबुतरांना दाणा टाकण्याची मागणी या आंदोलकांनी केली. फडणवीसांनी दिले होते निर्देश दादरमधील कबुतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही. या संदर्भात राज्य सरकार आणि महानगरपालिकेने उच्च न्यायालयात ठाम भूमिका मांडावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले होते. कबुतरखाना अचानक बंद करणे योग्य नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. या संदर्भात पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कंट्रोल फीडिंग करा, तांत्रिक पद्धतीने स्वच्छता करण्याचे निर्देश देखील फडणवीस यांनी दिले होते. दुष्परिणामांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणे आवश्यक मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते की, कबुतरांच्या आरोग्यपूर्ण देखभालीसाठी आणि नागरी आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही यासाठी कोणत्या वेळेत खाद्यपुरवठा व्हावा आणि कोणत्या वेळेत नाही याबाबत नियमावली तयार करण्यात यावी. शहरात विविध ठिकाणी कबुतरांच्या मोठ्या संख्येमुळे श्वसनविषयक त्रास, विष्ठेमुळे होणारे प्रदूषण आणि सार्वजनिक स्वच्छतेच्या समस्या निर्माण होतात. परंतू याबाबत कबुतरखान्याच्या आरोग्यविषयक दुष्परिणामांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणे आवश्यक असून, त्यासाठी संबंधित तज्ज्ञांच्या मदतीने अभ्यास अहवाल तयार करावा. कबुतरांच्या विष्ठेचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. यासंदर्भात विष्ठा साफ करण्यासाठी उपलब्ध असलेल्या तांत्रिक उपायांचा विचार करावा. या संदर्भात माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्याशी चर्चा केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले होते.