मुंबईतील कबुतरखान्यांच्या परिसरात पक्ष्यांना खाद्य टाकण्यास उच्च न्यायालयाने घातलेली बंदी कायम ठेवल्यानंतर जैन समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाचा आदेश लागू असूनही अलीकडेच दादर कबुतरखान्याजवळ काही जैन बांधवांनी कबुतरांना धान्य टाकले होते. मात्र, पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्यांना थांबवले. या कारवाईनंतर जैन समाजाने आता आक्रमक पवित्रा घेतला असून, 13 ऑगस्टपासून उपोषणाला बसणार आहेत. तर वेळ पडल्यास शांतताप्रिय असणारा आमचा समाज शस्त्रंही हातात घेईल आणि कोर्टाच्या आदेशालाही जुमानणार नसल्याचा इशारा जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी दिला आहे. यासंदर्भात बोलताना जैन मुनी निलेशचंद्र विजय म्हणाले, आम्ही सत्याग्रह आणि उपोषणाचा मार्ग वापरणार आहोत. शस्त्र उचलणे हा आमचा स्वभाव नाही, पण धर्माविरोधात पाऊल उचलले गेले तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही भारताचे संविधान, कोर्ट आणि सरकारला मानतो, परंतु आमच्या धार्मिक तत्त्वांवर गदा आणली तर आम्ही कोणालाही मानणार नाही. … तर कोर्टाच्या आदेशालाही जुमानणार नाही
जैन मुनी पुढे म्हणाले, 13 ऑगस्टपासून आम्ही उपोषणाला बसणार आहोत. मी एकटा आंदोलनाला बसणार नाही. देशभरातील 10 लाख जैन बांधव इकडे उपोषणाला बसतील. गरज पडल्यास शांतताप्रिय समाज असतानाही आम्ही धर्माच्या रक्षणासाठी शस्त्र उचलण्यास मागेपुढे पाहणार नाही. कोर्टाच्या आदेशालाही आम्ही जुमानणार नाही. जैन धर्मालाच का लक्ष्य केले जात आहे?
निलेशचंद्र विजय यांनी आरोप केला की, हा निर्णय राजकीय हेतूने आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतला गेला आहे. आमच्या ‘पर्युषण पर्वा’नंतर पुढचा निर्णय घेऊ. जीवदया हा आमच्या धर्माचा मूलभूत सिद्धांत आहे. मुंगीपासून हत्तीपर्यंत कुठल्याही जीवाचा वध होऊ नये, असे आमच्या धर्मात सांगितले आहे. मग जैन धर्मालाच का लक्ष्य केले जात आहे? असा सवालही त्यांनी केला. दारू व मांसाहारामुळे किती लोक मरतात, हेही दाखवा, असे निलेशचंद्र वियज यांनी म्हटले आहे. कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांकडून 68 हजारांचा दंड वसूल दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना खाद्य टाकण्यास बंदी असतानाही, काही लोक त्याचे उल्लंघन करत आहेत. याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेने आता कठोर पावले उचलली असून, अशा व्यक्तींवर कडक कारवाई सुरू केली असून, दंड आकारण्यात येत आहे. 13 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत पालिकेने 142 प्रकरणे नोंदवली असून, एकूण 68 हजार 700 रुपये दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे, सर्वाधिक दंड हा चर्चेत असलेल्या दादर पश्चिम भागातील कबुतरखान्यावरून गोळा करण्यात आला आहे. या ठिकाणी 51 व्यक्तींकडून 22 हजार 200 रुपये दंड वसूल झाला आहे.