राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री संजय शिरसाट आणि मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या वक्तव्यांबाबत विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, मंत्री अनेकदा भाषणामध्ये गमतीनेही बोलतात आणि प्रत्येक गोष्टीचा बाऊ करणे योग्य नाही. काही वक्तव्ये महत्त्वाची असतात, तर काही चुकीचीही असू शकतात. त्यामुळे प्रत्येक विधान गांभीर्याने घेणे आवश्यक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी सभेत बोलताना वादग्रस्त विधान केले होते. निधी मागा, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचे काय जाते, असे वादग्रस्त विधान केले होते. तसेच आमदार रोहित पवार यांनी मंत्री मेघना बोर्डीकरांचा देखील एक व्हिडिओ शेअर केला होता. यात मेघना बोर्डीकर ग्रामसेवकला इशारा दिल्याचे पाहायला मिळते. याद राख, मेघना बोर्डीकरचा शब्द आहे, कानाखाली घालील आता, आत्ताच्या आत्ता बडतर्फ करुन टाकेल,’ असा इशारा त्या देताना दिसते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादग्रस्त विधान प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, मंत्री आपल्या भाषणामध्ये कधीकधी गमतीने देखील बोलतात, प्रत्येक गोष्टीचा आपण बावू करू लागलो तर हे योग्य नाही. काही स्टेटमेंट महत्त्वाचे असतात काही चुकीचे असतात, मेघना बोर्डीकर यांच्यासोबत बोलणे झाले आहे, त्यांचे बोलणे माध्यमांवर अर्धवट दाखवण्यात येत आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, संजय शिरसाट जे बोलले त्यात चुकीचे वाटत नाही. मात्र, संयम ठेवून बोलले पाहिजे, असा सल्ला फडणवीस यांनी संजय शिरसाट यांना दिला आहे. संजय शिरसाट यांच्या व्यक्तव्याचा निषेध करत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी देखील खोचक टोला लगावला आहे.