कळमनुरी पंचायत समितीचा ग्रामसेवक तडकाफडकी निलंबित:विधानसभा मतदारसंघात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासोबत प्रचार करणे भोवले

कळमनुरी विधानसभा मतदार संघात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासोबत प्रचार करतांना ग्रामसेवकाचा व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर ग्रामसेवकाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून त्याच्या निलंबनाचे आदेश गुरुवारी ता. 7 रात्री उशीराने काढण्यात आले आहेत. कळमनुरी शहरातील शास्त्रीनगर भागात एका राजकिय पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार सुरु असतांना त्याठिकाणी ग्रामसेवक शिवशंकर गुठ्ठे हे सहभागी झाल्याचे छायाचित्रीकरण करण्यात आले. त्यानंतर याबाबतचा व्हिडिओ समाज माध्यमातून प्रसारित करण्यात आला. यामध्ये ग्रामसेवक गुठ्ठे हे ‘चला चला’असे म्हणत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, सदर व्हिडिओ निवडणूक विभागाकडेही पाठविण्यात आला. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते यांनी तातडीने कळमनुरीच्या गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. त्यात ग्रामसेवक गुठ्ठे हे राजकीय पक्षाच्या प्रचारात सहभागी झाल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला असून त्यामध्ये आपल्या अधिपत्याखालील कर्मचारी ग्रामसेवक शिवशंकर गुठ्ठे यांचा प्रचारात सहभाग असल्याचे दिसून येत आहे. सदर कर्मचारी आपल्या कार्यालयाच्या अधिनस्त असल्यामुळे त्यांच्या विरुध्द आपल्यास्तरावरून कार्यवाही करावी व त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी भुते यांनी दिले होते. या आदेशानंतर कळमनुरीचे गटविकास अधिकारी गणेश बोथीकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्याकडे याबाबतची माहिती सादर केली. त्यानंतर ग्रामसेवक गुठ्ठे यास तडकाफडकी निलंबीत करण्यात आले असून त्याच्या निलंबनाचे आदेश गुरुवारी ता. 7 रात्री उशीरा गटविकास अधिकारी बोथीकर यांनी काढले आहेत.

  

Share