कांद्याला चांगला भाव मिळाला की शेतकरी कांदाच लावत सुटतात:कृषी मंत्री कोकाटे यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; रोहित पवारांची टीका
कांद्याला चांगला भाव मिळाला की, शेतकरी कांदाच लावत सुटतात. त्यानंतर कांद्याचे भाव पडतात, असे म्हणत राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर थेट नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे आता कोकाटे पुन्हा एकदा टीकेचे धनी ठरले आहेत. या आधी देखील कोकाटे यांच्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला होता. आता पुन्हा एकदा त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुती सरकारमध्ये कृषिमंत्री सारखे महत्त्वाचे खाते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. मात्र, विद्यमान कृषिमंत्री कायमच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहत आहेत. त्यामुळे विरोधकांच्या हातात आयते कोलीत देण्याचे काम त्यांच्याकडून होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे नुकत्याच झालेल्या पक्षाच्या बैठकीत अजित पवार यांनी कोकाटे यांना चांगलेच खडसावले होते. मात्र, तरी देखील कोकाटे यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन त्यांनाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. जबाबदार व्यक्तीकडे कृषिमंत्री पद सोपवायला हवे – रोहित पवार या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले की, ‘कांद्याला चांगला भाव मिळाला की शेतकरी कांदाच लावत सुटतात आणि कांद्याचे भाव पडतात हा तर्क आहे महाराष्ट्र राज्याचे महान कृषिमंत्री कोकाटे साहेबांचा! कांद्याचे दर थोडेफार उत्पादन वाढल्याने पडत नाहीत तर केंद्र सरकारच्या निर्यात बंदी, निर्यात शुल्क यासारख्या धोरणांमुळे आणि झोपलेल्या राज्य सरकारमुळे पडतात. त्यामुळे राज्याच्या कृषिमंत्र्यांनी आपले ब्रम्ह ज्ञान शेतकऱ्यांना देण्याऐवजी केंद्र सरकारला दिले तर अधिक बरे होईल. कृषिमंत्री पद हे अत्यंत जबाबदारीचे पद आहे, परंतु विद्यमान कृषि मंत्र्यांना मात्र त्यांची जबाबदारी अजूनही समजलेली दिसत नाही, त्यामुळे नेतृत्वाने कृषिमंत्र्यांची राजकीय काळजी करण्यापेक्षा शेतकऱ्यांची काळजी करावी. अजितदादांनी धाडसी निर्णय घेऊन ज्याला शेतीची समज आहे, संवेदना आहे अशा जबाबदार व्यक्तीकडे कृषिमंत्री पद सोपवायला हवे.’ माणिकराव कोकाटे यांचे आधीही वादग्रस्त वक्तव्य