भाजपच्या माजी प्रवक्त्या ॲड. आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तिपदी नियुक्तीला कॉलेजियमने मंजुरी दिली आहे. मात्र त्यांच्या या नियुक्तीवरून विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2 फेब्रुवारी 2023 रोजी ॲड. साठे यांची भाजप प्रवक्ते पदावर नियुक्ती केली होती. या नियुक्तीच्या केवळ 18 महिने 23 दिवसांनंतर त्यांच्या नावाला कॉलेजियम कडून न्यायमूर्तिपदासाठी मंजुरी मिळाल्याने विरोधकांनी टीका केली आहे. मात्र, या प्रकरणावरून भाजपनेही पलटवार केला आहे. त्यासाठी भाजपने बहरूल इस्लाम यांचे उदाहरण दिले आहे. या संदर्भात भाजपने नेते केशव उपाध्ये यांनी एका पोस्टच्या माध्यमातून काँग्रेस आणि शरद पवार यांच्या पक्षावर टीका केली आहे. त्यांनी आधी इतिहास पहावा, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी आधी काँग्रेसचे राज्यसभा सदस्य नंतर न्यायमूर्ती आणि पुन्हा काँग्रेसचे राज्यसभा सदस्य बनलेले बहरूल इस्लाम यांचे उदाहरण देखील दिले आहे. केशव उपाध्ये यांची पोस्ट देखील पहा… या देशात काँग्रेसचे खासदार मग न्यायाधीश मग परत खासदार झाल्याचे उदाहरण आहेत. बहरूल इस्लाम हे त्याचे एक उदाहरण त्याची माहिती आधीच्या ट्विट मध्ये दिली आहे अजूनही उदाहरणे आहेत. सोबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा एक पॅरा जोडला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की यापूर्वीही अनेक वेळा राजकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना न्यायालयात नियुक्त करण्यात आले आहे त्यामुळे राजकीय क्षेत्राशी संबंध हा त्यांना बंदीचा मुद्दा असू शकत नाही. @RRPSpeaks व कॅाग्रेसने थोडी माहिती घ्या, इतिहास पहा. कोण आहेत आरती साठे मुंबई उच्च न्यायालयाच्या वकील आरती अरुण साठे, ज्या मुंबई भाजप कायदेशीर कक्षाच्या प्रमुख होत्या, त्यांना फेब्रुवारी 2023 मध्ये महाराष्ट्र भाजपच्या प्रवक्त्या म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तथापि, साठे यांनी जानेवारी 2024 मध्ये वैयक्तिक आणि व्यावसायिक कारणांमुळे एका वर्षानंतरच या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर, त्यांनी 6 जानेवारी 2024 रोजी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि मुंबई भाजप कायदेशीर कक्षाच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला. वडील अरुण साठे यांचे आरएसएस-भाजपशी संबंध साठे यांना वकील म्हणून 20 वर्षांहून अधिक कामाचा अनुभव आहे. त्या प्रामुख्याने प्रत्यक्ष कर प्रकरणांमध्ये तज्ज्ञ आहेत. त्या कर विवाद, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी), सिक्युरिटीज अपीलीय न्यायाधिकरण (एसएटी) आणि कस्टम्स, एक्साइज अँड सर्व्हिस टॅक्स अपीलीय न्यायाधिकरण (सीईएसटीएटी) तसेच मुंबई उच्च न्यायालयासमोरील वैवाहिक वादांच्या मुख्य वकिली करणाऱ्या आहेत. योगायोगाने, साठे यांचे वडील अरुण साठे हे देखील एक प्रसिद्ध वकील आहेत. ते आरएसएस आणि भाजपशी संबंधित आहेत. यापूर्वी ते भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्यही राहिले आहेत.