मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर येत ‘त्रिभाषा सूत्र’ मागे घेतल्याचा जल्लोष साजरा केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून, “समविचारी पक्ष असतील आणि काँग्रेसच्या मूल्यांना मान्यता देतील, तरच काँग्रेस अशा युतीसोबत पुढे जाईल,” असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. शनिवारी मुंबईत झालेल्या विजयी मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले की, हा मेळावा फक्त मराठी विषयाच्या पार्श्वभूमीवर एकत्र येऊन साजरा केलेला जल्लोष होता. ते आज बुलढाणा येथे माध्यमांशी बोलत होते. नेमके काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ? काँग्रेस आणि राष्ट्रवादी पहिल्यापासूनच एकत्र लढत होती, मात्र भाजपला दूर ठेवण्यासाठी 2019 मध्ये शिवसेनेने निर्णय घेतला. चर्चेनंतर महाविकास आघाडी अस्तित्वात आली. भाजपला दूर ठेवण्यासाठी राज्यात आणि देशात इंडिया अलायन्स तयार झाली. त्यावेळी आम्ही विधानसभा लोकसभा दोन्ही निवडणूक एकत्र लढलो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही कोणतीही आघाडी युती केली नाही. स्थानिक पातळीवर समविचारी पक्षासोबत युती करण्याचे अधिकार स्थानिक नेतृत्वाला दिले आहेत. समविचारी पक्षांचा संदर्भ आज रोजी उद्धव ठाकरे यांच्याशी संबंधित आहे. व्यापक स्वरुपाचा निर्णय घेतला जाईल, काँग्रेसच्या मूल्यांना जे स्वीकारतील त्यांच्यासोबत काँग्रेस पुढे जाईल, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले आहे. इतरत्र लक्ष भटकवणे हाच भाजपचा विषय विजयी मेळाव्यावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, मराठी विषयाच्या अनुषंगाने दोघांनी एकत्र येऊन साजरा केलेला हा जल्लोष आहे. आगामी काळात दोन्ही पक्षाकडून काही स्पष्टीकरण जेव्हा येईल तेव्हा चर्चा करता येईल. महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका याबाबतचा निर्णय स्थानिक काँग्रेस कमिटीवर सोपवण्यात आला आहे. निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नाहीत, त्या फेब्रुवारीमध्ये होतात की ऑक्टोबरमध्ये होतात की होतच नाही? हे गौडबंगाल आहे. मूळ विषय सोडून इतरत्र लक्ष भटकवणे हाच भाजपचा विषय आहे, अशी टीकाही त्यांनी केली. हिंदी सक्तीला काँग्रेसने सर्वप्रथम विरोध केला हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “या विजयी मेळाव्याचे एक दिवस अगोदर निमंत्रण होते. पण पूर्वनियोजित कामामुळे जाणे शक्य झाले नाही. विजय मेळाव्याला जाणे न जाणे हा दुय्यम भाग आहे. मात्र आगामी काळात मराठी भाषा वाचवण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे. हिंदी सक्तीच्या विरोधाला राजकीय पक्ष विविध संघटना यांच्यासोबतच काँग्रेस पक्षाने सर्वात प्रथम विरोध केला होता, असा दावा देखील सपकाळ यांनी केला.
आगामी निवडणुकांत युतीचे समीकरण कसे असणार? दरम्यान, राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात युती झाल्यास तीसरी आघाडी तयार होईल आणि महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल. यामुळे भाजपला अप्रत्यक्ष फायदा होईल, असे महायुतीतील नेत्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे पुढील महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस कोणाशी हातमिळवणी करते आणि कोणापासून अंतर ठेवते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.