काटा चमचा चालवणाऱ्यांनी आम्हाला तलवार चालवायला शिकवू नये, अशा शब्दात महाराष्ट्र निर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी भाजप आणि मंत्री नितेश राणे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे. मुस्लिम बहुल भागामध्ये लोकांना मारुन दाखवण्याचे आव्हान नितेश राणे यांनी दिले होते. त्यावरुन देशपांडे यांनी पलटवार केला आहे. भाजप नेत्यांनी चड्डीत रहावे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.भाजप मधील काही सुरेश आणि नरेश हा वाद पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या सर्वांनी चड्डीत राहावे, असा खणखणीत इशारा संदीप देशपांडे यांनी दिला आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, रजा अकादमीचा मोर्चा निघाला होता. त्या वेळी त्यांनी पोलिस माता भगिनींवर हात उचलला होता. त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत दाखवणारा महाराष्ट्र निर्माण सेना हा एकमेव पक्ष होता. त्यावेळी सर्व भाजपचे नेते शेपट्या घालून बसले होते. केवळ मनसेने मोर्चा काढला होता. मनसे त्यांना सरळ भिडली होती. त्यामुळे काटा-चमचा चालवणाऱ्यांनी आम्हाला तलवारी कशा चालवायच्या, ते शिकवू नये. असा टोला देखील त्यांनी मंत्र नितेश राणे यांनी लगावला आहे. या वेळी त्यांनी व्यापाऱ्यांना ही गंभीर इशारा दिला आहे. व्यापारी आहात, व्यापार करा, आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका. अशा कडक शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी कालच्या मीरा-भाईंदर मधील व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रात कोणती भाषा चालते? हे व्यापाऱ्याला माहीत नव्हते का? अशा पद्धतीने महाराष्ट्रात मराठी भाषेचा अपमान करण्याचा कोणी प्रयत्न केला तर काना-खालीच बसेल. व्यापारी आहात, व्यापार करायला आला आहात, व्यापार करा. त्यांनी नसत्या भानगडीत नाक खुपसू नये. नाहीतर व्यापार सोडून, दुकानाच्या काचा बदलत बसावे लागेल, हे लक्षात ठेवा. असा इशारा देखील संदीप देशपांडे यांनी दिला आहे. मीडियाने आम्हाला बदनाम करण्याचे ठरवले मुंबईतील उत्तर भारतीय व्यापाऱ्यांचा आंदोलन हे देश पातळीवर चर्चेचा विषय ठरले आहे. मात्र काही सो-कॉल्ड नॅशनल मीडिया समजणारे मीडिया याला हवा देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देशपांडे यांनी केला आहे. मात्र उत्तर भारतात मीडियामध्ये बसलेल्या भैया अँकरला मराठी किती कळते? हे माहीत नाही. त्यांनी आधी आमची भूमिका समजून घ्यावी. आम्हाला चर्चेला बसवले जाते आणि आमचे माईक म्यूट केले जातात. त्यामुळे आता आम्ही हिंदी मीडियाच्या चर्चेला देखील जात नसल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. मीडियाने आम्हाला बदनाम करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे बाजू मांडत नसल्याचे देशपांडे यांनी सांगितले. मीडियाने मीडियासारखे रहावे. तुम्ही दिल्लीत बसून भैया लोकांची बाजू घेणार असाल तर आम्हाला अशा मीडियाची गरज नाही, असे देखील संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. मेळाव्यातील सर्व गोष्टी जवळजवळ निश्चित उद्याच्या मेळाव्याची जोरात तयारी चालू आहे. वरळी डोमला देखील आम्ही भेट दिली आहे. पोलिसांची देखील चर्चा झाली आहे. सर्व गोष्टी जवळजवळ निश्चित झालेल्या आहेत. आज संध्याकाळी बाळा नांदगावकर ठाकरे गटाच्या नेत्यांशी एकत्र बसून अंतिम निर्णय घेणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष मेळाव्याला उपस्थित राहण्याबाबत काहीही बोलण्यास देशपांडे यांनी टाळले आहे.