अजित पवारांचा ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध:महाराष्ट्रातील जनता असे नारे स्वीकारत नसल्याचा केला दावा; बारामतीत सभा घेण्यासही नकार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ सारख्या कथित प्रक्षोभक विधानांपासून अंतर राखण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातील जनता अशा घोषणांना केव्हाच स्वीकारणार नाही, असे ते म्हणालेत. अजित पवारांनी आपल्या मतदारसंघात इतर कोणत्याही नेत्यांच्या सभांची गरज नसल्याचेही ठणकावून सांगितले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे महायुतीत बेबनाव निर्माण झाला आहे की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. योगी आदित्यनाथ यांनी आपल्या महाराष्ट्रातील प्रचारसभेत बटेंगे तो कटेंगे असे विधान करत हिंदुंना आपले ऐक्य टिकवण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या घोषणेवरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. अजित पवारांनी याविषयी अत्यंत कठोर भूमिका घेत आपल्या मतदारसंघात आपल्याला कुणाचीही सभा नको असल्याचे ठणकावून सांगितले आहे. बाहेरचे लोक येतात आणि काहीही बोलून जातात अजित पवार यासंबंधी म्हणाले, मी माझ्याकडे कोणी येऊ नका, असे स्पष्टपणे सांगितले आहे. इतर 287 विधानसभा मतदारसंघांमध्ये खूप काम आहे. ते बारामतीमध्ये जेवढा वेळ देणार आहेत, तेवढा वेळ त्यांनी इतर ठिकाणी कामी आणावा. मी माझी सभा घ्यायला आणि प्रचार करायला सक्षम आहे. महाराष्ट्र शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा आहे. त्यामुळे त्याची इतर राज्यांशी तुलना होऊ शकत नाही. कारण, येथील जनतेला तसे अजिबात आवडत नाही. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. महाराष्ट्रातील लोकांनी नेहमीच जातीय सलोखा राखण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतरही काही बाहेरचे लोक येतात आणि येथे आपले मत मांडून जातात. पत्रकारांनी यावेळी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा बारामतीत होणार का? असा प्रश्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 तारखेला पुण्यात सभा घेणार आहेत. त्यांच्यासारखे मोठे नेते येतात तेव्हा ते तालुक्याच्या नव्हे तर जिल्ह्याच्या ठिकाणी सभा घेतात. बारामतीही पुणे जिल्ह्यात येते. त्यामुळे ती सभा बारामतीकरांसाठीही असेल, असे ते म्हणाले. मोदींना आता अजित पवारांना निवडून आणायचे आहे त्यानंतर पत्रकारांनी त्यांना पुन्हा पंतप्रधान मोदींनी 2014 मध्ये बारामतीमध्ये सभा घेतली होती अशी आठवण करून दिली. त्यावर ते म्हणाले, त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. तिथे अजित पवार नावाचा माणूस उभा होता. त्याला पराभूत करण्यासाठी त्यांनी ती सभा घेतली होती. पण आता त्यांना अजित पवारांना पराभूत करायचे नसून त्यांना निवडून आणायचे आहे. त्यामुळे ते यावेळी बारामतीत सभा घेत नाहीत. नवाब मलिक यांची पाठराखण उल्लेखनीय बाब म्हणजे अजित पवारांनी यावेळी नवाब मलिक यांना मानखुर्द शिवाजीनगर येथून दिलेल्या उमेदवारीचेही समर्थन केले आहे. तसेच त्यांचा प्रचार यापुढेही करण्याचेही सूतोवाच केले आहे. नवाब मलिक यांना आम्ही आमच्या पक्षाची उमेदवारी दिली. त्यामुळे त्यांच्या प्रचाराला मी जाईलच. नवाब मलिक यांच्यावर केवळ आरोप झालेत. हे आरोप सिद्ध झाल्याशिवाय तुम्ही त्यांना दोषी ठरवता येणार नाही, असे ते म्हणाले.

  

Share