राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला रेव्ह पार्टी प्रकरणात अटक झाली आहे. त्यानंतर खडसे यांनी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यातच एकनाथ खडसे यांनी पुण्यातील मुलीच्या राहत्या घरी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत पोलिस खात्यातील दहा ते बारा लोक घुसले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात आपण पोलिस इन्स्पेक्टर सोबत बोललो असून त्यांनी हे कबूल केले असल्याचे देखील खडसे यांनी सांगितले आहे. या धक्कादायक प्रकारामुळे आता विरोधात आणखीन आक्रमक होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संदर्भामध्ये एकनाथ खडसे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी या कर्मचाऱ्यांचे व्हिडिओ देखील पोस्ट केले आहेत. या पोलिस कर्मचाऱ्यांना घरात घुसण्याची परवानगी कोणी दिली? कुणाच्या इशाऱ्यावर हे अधिकारी पाठवण्यात आले? आमच्या कुटुंबाची अजूनही देखील रेकी केली जात आहे का? आमच्या कुटुंबाच्या विरोधात आणखी एखादे कुभांड रचले जात आहे का? असे प्रश्न खडसे यांनी उपस्थित केले आहे. इतक्या खालच्या पातळीचे राजकारण आज पर्यंत पाहिले नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. खडसे यांनी केलेली पोस्ट देखील पहा…. आज माझ्या मुलीच्या पुण्यातील राहत्या घरी मी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला काही अनोळखी लोक शिरले असल्याचे पत्रकार बांधवांनी माझ्या निदर्शनास आणून दिले. या माणसांना आम्ही जाब विचारला तर त्यांनी पोलीस कर्मचारी असल्याचे सांगितले. तब्बल १०-१२ लोक ?(हेडकॉन्स्टेबल दिपक कांबळे, चंद्रकांत रेजीतवाड, पोलीस इन्स्पेक्टर विक्रम गौर अशी काहींची नावे आहेत) या लोकांनी कोणते तरी जगदाळे म्हणून अधिकारी आहेत त्यांना फोन जोडून दिला तर या जगदाळेंनी कबूल केले की त्यांनीच ही माणसं पाठवली. हे जगदाळे कोण ? त्यांची ही माणसं माझ्या मुलीच्या घरात अशीच कशी शिरतात ? त्यांना कुणी परवानगी दिली ? या लोकांचा हेतू काय ? या जगदाळेंचा बॉस कोण आहे ? कुणाच्या इशाऱ्यावर ही माणसं पाठवली गेली होती ? याचे उत्तर आम्हाला हवे आहे. माझ्या कुटुंबाची अजूनही रेकी केली जात आहे. माझ्या कुटुंबाविरोधात कुणाला आणखी एखादं कुभांड रहायचे आहे का ? असा प्रश्न मला पडतो आहे. माझ्या ३५-४० वर्षांच्या संसदीय कारकीर्देत मी इतक्या खालच्या पातळीचे राजकारण पाहिले नाही.