खुलताबादचे नाव रत्नपूर होणारच, इम्तियाज जलील पुन्हा ‘जलील’ होतील:शिवसेना नेत्याची टीका; ठाकरे गटावरही साधला निशाणा
खुलदाबादचे नाव बदलन्याचा प्रस्ताव नक्कीच मान्य होईल आणि इम्तियाज जलील पुन्हा एकदा जलील होतील. त्यांनी औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याला देखील विरोध केला होता. अशी टीका शिवसेना नेते संजय निरुपम यांनी केली आहे. औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबाद शहराचे नाव रत्नपूर करण्यात येणार आहे. त्यावरुन इम्तियाज जलील यांनी विरोध दर्शवला होता. त्याला आता संजय निरुपम यांनी प्रत्युत्तर दिले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलदाबाद शहराचे नाव रत्नपूर करण्याच्या मागणीला विरोध करत महाराष्ट्र AIMIM चे अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महायुतीवर टीका केली होती. त्याला आता शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे. या संदर्भात संजय निरुपम यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना जलील यांच्यावर टीका केली. विनोदी अभिनेता कुणाल कामरा याच्या वादावरुनही शिवसेना नेते संजय निरुपम यांनी ठाकरे गटावर टीका केली. ते म्हणाले की, शिवसेने (यूबीटी) ने कुणाल कामरा याला पैसे दिले आणि त्यांच्या सूचनेनुसार हे विडंबन गाणे बनवण्यात आले… मातोश्री यात सहभागी आहे आणि मातोश्रीचा निधी यामध्ये वापरण्यात आला आहे… शिवसेनेचे (यूबीटी) कार्यकर्ते गायब झाले आहेत आणि म्हणूनच ते एका विनोदी कलाकाराच्या मदतीने राजकारण करत असल्याचा आरोपही निरुपम यांनी केला आहे. आवडले नाही म्हणून मी हे नाव बदलले हे सांगून टाका – इम्तियाज जलील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी खुलताबादचे नामांतर रत्नपूर असे करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीवर एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी अत्यंत जहाल शब्दांत निशाणा साधला आहे. तुम्ही शहरांची, इमारतींची व रस्त्यांची नावे बदलत आहात. आता नावे बदलण्याची मालिका सुरुच झाली असेल तर आपल्या बापाचेही नाव बदलून घ्या. आम्हाला हे नाव आवडले नाही म्हणून मी हे नाव बदलले हे सांगून टाका, अशा शब्दात जलील यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांवर टीका केली होती. इंग्रजांच्या काळात खुलताबाद शहराला रत्नपूर म्हणून ओळख औरंगजेबाने आपल्या ठिकाणांची नावे बदलली होती. त्याची कबर खुलताबाद येथे आहे. पण इंग्रजांच्या काळात हे शहर रत्नपूर म्हणून ओळखले जात होते. काही लोकांना औरंगजेबावर प्रेम उसळून येत आहे. पण आपल्याला आपली संस्कृती वाचवावी लागेल. आम्ही औरंगजेबाची प्रॉपर्टी हिसकावून घेणार नाही. आम्ही केवळ त्याने केलेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करत असल्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले होते. दौलताबादचेही नाव देवगिरी असे होते. तिथे राजा रामदेवराय यांनी राज्य केले होते. हा त्यांचा वारसा आहे. ते नाव सुद्धा बदलण्याची गरज आहे. आम्ही यासंबंधी कोणतीही नवी मागणी करत नाही. औरंगजेबाने येथील प्रदेश काबिज केल्यानंतर त्याने त्यांची नावे बदलली. आता तेच आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करत आहतो. आम्ही लवकरच यासंबंधीचा एक प्रस्ताव मुख्यमंत्र्यांपुढे सादर करू. विधानसभेतही या प्रकरणी एक प्रस्ताव सादर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले होते.