पुण्यातील कोथरूड येथील रामबाग कॉलनीतील केसरी अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी दोन सदनिका फोडून २२ लाख १७ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी शान चिटणीस (५१) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शान चिटणीस यांची केसरी अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावर दोन नंबरची सदनिका आहे. त्याचबरोबर पहिल्या नंबरची सदनिकाही याच इमारतीत आहे. ते दरवाजाला कुलूप लावून बाहेर गेले असताना चोरट्यांनी सदनिकेच्या दरवाजाचे कुलूप व लॅच तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी लाकडी कपाटाचे ड्रॉवर उचकटून त्यामधील हिऱ्यांचे दागिने, सोन्याचे दागिने, चांदीची नाणी आणि रोख रक्कम असा एकूण २२ लाख १७ हजारांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सदनिका एक आणि दोन मध्ये चोरी झाल्याची नोंद केली आहे. दरम्यान, पुण्यातच दुसरी एक फसवणुकीची घटना समोर आली आहे. सलग पंधरा वर्षे वर्षातून एकदा सात दिवसांची भारतात तसेच परदेशात सहल आणि चांगल्या हॉटेलची राहण्याची व्यवस्था करण्याचे आमिष दाखवून दोन लाख ८७ हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. निता बिजेंद्रकुमार मकरारीया (६०) यांनी काळेपडळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पूनम मिश्रा, अल्फीया आणि विनटेज वेब्स सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी कंपनीच्या खात्यावर एकूण २ लाख ८७ हजार रुपये भरायला लावून टूरसाठी कोणतीही सेवा न देता फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.