मागील विधीमंडळाच्या अधिवेशनादारम्यान कॉमेडियन कुणाल कामरा आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. आता पावसाळी अधिवेशनात प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्यामुळे या दोघांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कुणाल कामराने त्याच्या एका शोमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक गाणे गायले होते. एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड तसेच त्यांची दाढी चष्मा यावरून कुणाल कामराने विडंबनात्मक गाणे गायले होते. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत जिथे कार्यक्रम झाला होता तिथली तोडफोड केली होती. मुंबईतील काही पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. तसेच सुषमा अंधारे यांनी देखील कुणाल कामराचे गाणे गात एक व्हिडिओ बनवला होता. त्यामुळे या दोघांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्यात आला होता. त्या प्रस्तावाला आता मंजूरी मिळाली आहे. कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात सोमवारी नोटीस काढली जाणार असून या दोघांच्या अडचणीत वाढ होणार आहे. प्रवीण दरेकरांनी मांडला हक्कभंगचा प्रस्ताव भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी हा हक्कभंग दाखल केला आहे. सुषमा अंधारे यांनी बोलताना वापरलेली खालच्या पातळीवरील भाषा आणि कुणाल कामराने हेतुपूरस्सर उपमुख्यमंत्री यांच्यावर वैयक्तिक आणि उपरोधक केलेले गाणे यातील भाषा एकप्रकारे सभागृहाचा अवमान करणारी आहे. त्यामुळे कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्याविरोधात हक्कभंग मांडण्यास अनुमती द्यावी, अशी विनंती प्रवीण दरेकर यांनी केली होती. यावर सभापती राम शिंदे यांनी हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे योग्य त्या कारवाईसाठी पाठवत असल्याचे जाहीर केले आहे.