लाडकी बहीण योजनेचा आनंदाचा शिधा योजनेला फटका. यंदाच्या गणेशोत्सवात आनंदाचा शिधा मिळणार नसल्याची माहिती राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी 45 हजार कोटी रुपये द्यावे लागणार असल्याने आनंदाचा शिधा देऊ शकत नाही, असे भुजबळ यांनी स्पष्टच सांगितले आहे. आनंदाचा शिधा या योजनेतून राज्यातील गरिबांना सणासुदीच्या काळात केवळ 100 रुपायांमध्ये चार वस्तू योजनेच्या माध्यमातून मिळत होत्या. परंतु, आता लाडकी बहीण योजनेमुळे गोरगरिबांना सणासुदीच्या काळात आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील तिजोरीतील एकदम 45 हजार कोटी रुपये लाडकी बहीण योजनेसाठी द्यावे लागणार आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम इतर योजनांवर थोडा थोडा होत असल्याची कबुली छगन भुजबळ यांनी दिली आहे. आम्ही आता राज्य सरकारचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सध्या योजनांचा निधी बाबत मागेपुढे होत असले तरी आम्ही निधी उपलब्ध होईल तशी योजना चालवत राहू, असे भुजबळ म्हणाले. पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, आनंदाचा शिधा द्यायचा असेल तर त्यासाठी दोन ते तीन महिने आधी टेंडर काढावे लागते. आता तरी हे शक्यत नाही. आनंदाचा शिधा आत्ता मिळणार नाही. त्यासाठी टेंडर काढावे लागते, त्यासाठी दोन तीन महिन्यांचा कालावधी लागतो. वर्षाला शिवभोजन थाळी साठी 140 कोटी रुपये तर आनंदचा शिधा साठी 550 कोटी रुपये लागत होते. आनंदाचा शिधा या योजनेतून सणासुदींच्या निमित्ताने राज्यातील रेशनकार्ड धारकांना फक्त 100 रुपयात काही जीवनावश्यक वस्तू देण्यात येत होत्या. त्यामध्ये एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो चना डाळ, एक लीटर पामतेल देण्यात येत होते. आता हा शिधा यंदा देण्यात येणार नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ही योजना सुरू करण्यात आली होती. 2022 साली दिवाळीला पहिल्यांदा आनंदाचा शिधा देण्यात आला होता.