लातूरमध्ये राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा:विजेत्याला दीड लाखासह चांदीची गदा; 75 वर्षांवरील मल्लांनाही संधी
माईर्स एमआयटी, पुणे आणि यज्ञभूमी रामेश्वर (रुई) ग्रामस्थांच्या वतीने दादाराव कराड स्मृती राज्यस्तरीय कुस्ती महावीर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २१ मार्च २०२५ रोजी लातूरमधील रामेश्वर (रुई) येथे होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ९ वाजता होईल. राज्याचे युवक व क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी ७ वाजता बक्षीस वितरण समारंभ होईल. हिंद केसरी पै. जगदीश कालीरमण, पै. दिनानाथ सिंग आणि महाराष्ट्र केसरी पै. आप्पासाहेब कदम, पै. रावसाहेब मगर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ कराड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या स्पर्धेत सर्वश्रेष्ठ विजेत्या मल्लाला महाराष्ट्र कुस्ती महावीर हा किताब, १ लाख २५ हजार रुपये रोख आणि चांदीची गदा मिळणार आहे. द्वितीय क्रमांकाला १ लाख रुपये, तृतीय क्रमांकाला ५० हजार आणि चौथ्या क्रमांकाला २५ हजार रुपये मिळतील. स्पर्धेत ५७ ते १२५ किलो वजन गटांमध्ये स्पर्धा होणार आहे. विशेष म्हणजे योग महर्षी शेलारमामा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ७५ वर्षांवरील मल्लांसाठी विशेष कुस्ती स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धकांची वजने २० मार्च रोजी सायंकाळी ४ ते ८ या वेळेत घेतली जातील. सहभागी होणाऱ्या मल्लांना आधार कार्डाची मूळ प्रत व झेरॉक्स आणणे बंधनकारक आहे. स्पर्धा राज्य संघटनेच्या नियमानुसार घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतीही प्रवेश फी आकारली जाणार नाही. स्पर्धेसाठी येणार्या निवडक कुस्तीगीरांच्या जाण्या येण्याचे एस.टी.भाडे, निवासाची व भोजनाची व्यवस्था संयोजकांतर्फे करण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रा. विलास कथुरे (मो.९८५०२११४०४), राहुल हरिश्वचंद्र बिराजदार (मो.८००७५९३४३४) व निखील वणवे (मो. ७२७६३३७६७०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.