लोढा बिल्डरकडून हजारो ग्राहकांची फसवणूक:ठाण्यात मनसेचे आंदोलन, बिल्डरच्या घशातून पैसे काढणार – अविनाश जाधव

ठाणे येथील कोलशेत भागात लोढा बांधकाम व्यावसायिकांच्या एका प्रकल्पात हजारो ग्राहकांची फसवणूक झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. या प्रकल्पात हजारो ग्राहकांनी पैसे गुंतवले होते. मात्र, यातील काहींचे बँकेचे कर्ज मंजूर न झाल्याने त्यांच्या घरांची नोंदणी रद्द करत सुरुवातीला भरलेली अनामत रक्कम परत करण्याची मागणी केली. परंतु, बांधकाम व्यावसायिकाने ग्राहकांचे पैसे परत करण्यास विरोध केला आहे. याच्याविरोधात मनसेने ठाण्यात आंदोलन केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात फसवणूक झालेल्या हजारो ग्राहकांच्या हक्कासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसेने व्यावसायिकाच्या विरोधात विविध अशयांचे फलक हातात घेतले होते. तसेच ग्राहकांची फसवणूक झाल्याप्रकरणी लोढाच्या कर्मचाऱ्यांना जाब देखील विचारला आहे. काही ग्राहकांचे बँकेतून कर्ज मंजूर झाले नसल्याने त्यांच्या घराची नोंदणी रद्द करत त्यांचे पैसे परत करण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र याला बिल्डरकडून विरोध करण्यात आल्याने मनसेने हे आंदोलन केले. यावेळी बोलताना अविनाश जाधव म्हणाले, लोढा बिल्डर हजारो मराठी तरुणांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे. हे लोक आकर्षित ऑफर तयार करतात आणि गरिबांसाठी स्वस्तात घर आणि अशा प्रकारे वेगवेगळे ऑफिस काढतात. गणेश भोईर नावाचा एक रिक्षा चालक आहे. त्यांनी दोन वर्षांपूर्वी फ्लॅट बूक केला आणि 3 लाख रुपयांची अनामत रक्कम भरली. त्यानंतर त्यांनी कर्जासाठी अर्ज केला, मात्र त्यांचे कर्ज मंजूर झाले नाही. त्यामुळे फ्लॅट बूक केलेला रद्द करण्यासाठी तो गेला आणि तुमचे जे काही पैसे असतील ते वजा करून उर्वरित रक्कम परत करा असे सांगितले. यावर गेल्या 2 वर्षांपासून बिल्डरकडून पैसे मिळालेले नाहीत. काल त्याला सांगितले की पैसे मिळणार नाहीत, जे करायचे ते कर. पुढे बोलताना अविनाश जाधव म्हणाले, आणखी एक केतकी नावाची मुलगी आहे. त्यांचा हॉटेल व्यवसाय होता आणि आई-वडील नसलेली मुलगी आहे. तिने देखील 15 लाख रुपये भरले आणि तिला 10 लाख रुपये परत देण्यात आले. आम्ही सोबत असल्यामुळे त्यांचे 5 लाख रुपये कट करण्यात आले. नाईक आणि पंडित नावाच्या महिला आहेत, त्यांनी देखील दोन कोटी आठ लाखांचे घर घेतले. त्यांना 65 लाखांचा दंड आकारला गेला आहे. अशा हजारो केस बिल्डरच्या विरोधात आहेत. लोढा हे मंत्री असल्यामुळे दखल घेतली जात नाही. रिक्षा चालक गणेश त्यांचे पैसे परत मिळावे यासाठी एक वर्षापासून पाठपुरावा करत आहे. त्यांना अजून कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग दिलेला आहे. त्या मार्गाचा वापर करून आम्ही आंदोलन करत आहोत, असे अविनाश जाधव म्हणाले. लोढा बिल्डरच्या घशातून पैसे काढणार म्हणजे काढणार अविनाश जाधव म्हणाले, जोपर्यंत पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत आम्ही जाणार नाही. रेराचा कायदा आहे की बूकिंग रद्द केल्यावर पूर्ण पैसे मिळतील. बिल्डर पैसे परत करत नाही. हा एक बिल्डरचा विषय नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील बिल्डरचा विषय आहे. नाव मोठे दर्शन खोटे. आम्ही लोढा बिल्डरच्या घशातून पैसे काढणार म्हणजे काढणार, असे अविनाश जाधव म्हणाले.

  

Share