लांगुलचालन करण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका:मतांसाठी काँग्रेसची परंपरा अवलंबलेले पाहून दुःख होते; फडणवीसांची टीका

केवळ एका समाजाच्या मतासाठी उद्धव ठाकरे यांनी अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन करण्याची परंपरा अवलंबली असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. जेसीपीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने वक्फ बोर्डासंदर्भातील विधेयकाला केलेला विरोध केला होता. यावरुन फडणवीसांनी निशाणा साधला. दिल्लीतील महाराष्ट्र भवनातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्या सेनेने सातत्याने एका समाजाचे लांगुलचालन करण्याची भूमिका घेतली आहे. केवळ एका समाजाच्या पाठीशी उभे राहायची काँग्रेसची परंपरा होती. तीच अल्पसंख्यांक समाजाचे लांगुलचालन करण्याची परंपरा उद्धव ठाकरे यांच्या सेनेने अंगीकारली आहे. हे पाहून मला अतिशय दुःख होत आहे. वक्फ बोर्डासंदर्भातील विधेयक हे कोणाच्याही विरोधात नाही. ते कोणत्या समाजाच्या विरोधात नाही. तर केवळ यामध्ये जो गैरव्यवहार सुरू होता, त्याच्या विरोधात आहे. तरी देखील या विधेयकाला विरोध करण्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे. केवळ एका समाजाच्या मतासाठी उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका घेतली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दिल्ली विधानसभेतील विजयाचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करण्यासाठी दिल्लीत आहेत. त्यामुळे पत्रकारांनी त्यांना दिल्ली निवडणुकीसंदर्भात देखील प्रश्न विचारला. या वेळी दिल्लीमध्ये परिवर्तन दिसत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. लोकांच्या मनामध्ये परिवर्तन आहे. गेल्या दहा वर्षात जे अपेक्षित होते, त्यातले काहीही काम झालेले नाही. दिल्लीकर सातत्याने लोकसभेमध्ये मोदीजींना निवडतात. त्यामुळे यावेळी विधानसभेची चावी आणि विधानसभेवर मोदींचा झेंडा लागावा अशा प्रकारची लोकांची अपेक्षा मला दिसत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी साहित्य संमेलनाला येणार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीत होणार आहे. या संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिले साहित्य संमेलन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः या संमेलनाला येणार असल्याचे त्यांनी मान्य केला आहे. त्यामुळे ही मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

  

Share